पुणे दि २९:- पुणे शहरातील आंबिलओढा परिसरातील रहिवाशांची घरे तोडण्याची पुणे मनपाची कृती बेकायदेशीर असून ही कारवाई माझ्या नागपुरात झाली असती तर मी बुलडोझरसमोर झोपलो असतो आणि ही कारवाई थांबवली असती अश्या शब्दांत राज्याचे ऊर्जामंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत यांनी आपली संतप्त भावना व्यक्त केली. माझ्या दलित बांधवांवर होणारा अन्याय मी खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आंबिल ओढा परिसरातील रहिवाशांची घरे तोडण्याची पुणे मनपाची कृती चुकीची असून आज लोकांना होत असलेल्या त्रासासाठी पुणे मनपा आणि मनपातील सत्ताधारी दोषी आहे, अशी टीकाही त्यांनी केली.या परिसरातील रहिवाशांची भेट घेतल्यावर त्यांनी आंबिल ओढा परिसरात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. तसेच त्यानंतर पुणे शहर काँग्रेस भवनात त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.
मनपाला भलेही कायदेशीर अधिकार असतील. मात्र पावसाळ्यात लोकांची घरे तोडू नये असे स्पष्ट निर्देश आहेत.अशातच सध्या कोरोनामुळे सामाजिक अंतर हा निकष ही महत्वाचा आहे. असे असताना ही घरे तोडताना पुणे मनपाला लाज वाटायला हवी होती. पुणे मनपाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, महापौर व पदाधिकारी यांनी घरांची ही तोडफोड थांबवायला हवी होती. माझ्या नागपुरात असे झाले असते तर मी बुलडोझरसमोर झोपलो असतो आणि कारवाई थांबवली असती,”
अश्या संतप्त शब्दांत त्यांनी पुणे मनपा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.मला नागपूरला असताना हा प्रकार कळला आणि मी अस्वस्थ झालो. माझ्या दलित बांधवावर असा अन्याय होत असताना, माझ्या दलित भगिनींचा असा अपमान होत असताना मी शांत कसा राहणार?म्हणून मी थेट पुणे गाठून माझ्या लोकाना भेटायला आलो. त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. न्याय मिळवून देण्यासाठी व या गंभीर प्रकाराची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई झाली पाहिजे यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल,अशी ग्वाही डॉ.राऊत यांनी आज दिली.दांडेकर पुलाजवळील आंबिल ओढा परिसरातील नागरिकांची घरे जेसीबी व बुलडोझरने हटविण्यासाठी पुणे महानगरपालिकेने कारवाई सुरु केली होती. त्यास राज्य शासनाने स्थगिती दिली. त्यानंतर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज सकाळी आंबिल ओढा परिसराला भेट दिली व तेथील नागरिकांशी थेट संवाद साधला. सुमारे पाऊण तासांच्या या भेटीमध्ये डॉ. राऊत यांनी नागरिकांना धीर देत आस्थेने विचारपूस केली.यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, शहराध्यक्ष व माजी राज्यमंत्री रमेश बागवे, आबा बागूल, अभय छाजेड, दीप्तीताई चवधरी, प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे कार्याध्यक्ष गौतम अरकडे व उपाध्यक्ष सुजीत यादव,अविनाश बागवे, रवींद्र धंगेकर,अजित दरेकर आदींची उपस्थिती होती महिलांशी गैरवर्तन चुकीचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले की, पुनर्वसनासाठी स्थानिक नागरिक सहकार्य करण्यासाठी तयार आहेत. मात्र त्यांना योग्य माहिती दिली जात नाही. विश्वासात घेतले जात नाही. त्यांची बाजू ऐकून घेण्यात येत नाही. याउलट अचानक घरे हटविण्याची कारवाई केली जाते. आणखी संतापजनक बाब म्हणजे कारवाई दरम्यान महिलांवर हात उगारले गेले,त्यांचे केस ओढण्यात आले. विरोध करणाऱ्यांना मारहाण करण्यात आली. पोलिसांनी लाठीचार्ज केला. या भागातील बहूसंख्य लोक फुलांचे गजरे व हार विकून पोट भरतात. गेल्या दोन वर्षांपासून आंबिल ओढ्यातील गोरगरिबांचे जगणे कोरोनामुळे मंदिरे बंद असल्याने त्यांचे जगणे अतिशय हलाखीचे व खडतर झाले आहे. त्यातच महानगरपालिकेच्या या अन्याय्य कारवाईमुळे त्यांच्या संकटात भर पडली आहे,असे ते म्हणाले.कोणत्याही परिस्थितीत आंबिल ओढा परिसरातील झोपडपट्टीवासियांवर अन्याय होऊ देणार नाही व त्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. त्याची जबाबदारी मी घेतली आहे, अशी ग्वाही ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी दिली.आयुक्तांशी केली चर्चा डॉ. राऊत यांनी महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेऊन या कारवाईची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आंबिल ओढा परिसरातील रहिवाशयांची घरे तोडल्याबद्दल डॉ. राऊत यांनी मनपा आयुक्तांसोबतच्या भेटीत तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी चौकशी करून गुन्हे दाखल करा,अशी सूचनाही त्यांनी आयुक्तांनी केली.
लोकांच्या जीवनात फुलांचे हार आणि गजरे बनवून सुगंध पेरणाऱ्या महिलांच्या जीवनात पुणे मनपाच्या चुकीच्या कृतीने आकाश कोसळले. अनेकांचा संसार उघड्यावर आला. आंबील ओढा परिसरात भेटी दरम्यान या कारवाईत घर गमावलेल्या वृद्ध महिलेची विचारपूस ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी केली.