पुणे, दि.23:- पुणे शहरातील गुन्हेगारावर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उचलला आहे. खंडणी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्नासह गंभीर गुन्हे करुन पुणे शहरातील कात्रज परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या चुहा गँगच्या म्होरक्यासह 5 जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.साकीब मेहबुब चौधरी उर्फ लतिफ बागवान (वय-22), चंद्रशेखर उर्फ शेखर ठोंबरे (वय-24), तन्वीर जमीर सय्यद (वय-27), ऋतिक चंद्रकांत काची (वय-19 चौघे रा.संतोषनगर, कात्रज) व अझरुद्दीन दिलावर शेख (वय-20 रा. अंजलीनगर, कात्रज) अशी मोक्का कारवाई केल्यांची नावे आहेत.साकीब चौधरी व त्याच्या साथीदारांनी 3 जुलै रोजी रात्री साडे आठच्या सुमारास दत्ता नथू जाधव (वय-44 रा. नवीन वसाहत, कात्रज) हे पोलिसांना माहिती देतात,या संशयावरुन आरीपींनी त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणात पोलिसांनी साकीबसह त्याच्या साथिदारांना तात्काळ अटक केली होती.आरोपी संघटीतपणे 2017 पासून गंभीर गुन्हे करीत होते.आरोपींवर तडीपारीची कारवाई करुन देखील त्यांच्यामध्ये सुधारणा होत नव्हती.त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे पाठवला होता.त्यानंतर संजय शिंदे यांनी आरोपींवर कारवाई करण्यास मंजूरी दिली.पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण ) करीत आहेत.