पुणे ग्रामीण दि, २९ :- लोणावळा परिसरातील डॉ. हिरालाल खंडेलवाल (वय 73) यांच्या घरात काही दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास खिडकीद्वारे प्रवेश करून चाकून धाकाने डॉक्टर दाम्पत्याचे हातपाय बांधून धाडसी दरोडा टाकणाऱ्या 15 जणांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुंबई व मध्यप्रदेशातून आरोपींना अटक केली. आहे त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, मोबाईल फोन असा 30 लाख 52 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अटक केलेले सर्व आरोपी मुंबईतील फिल्मसिटीत मजूर म्हणून कामाला होते.अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, एपीआय नेताजी गंधारे, एपीआय सचिन काळे, पीएसआय रामेशवर धोंडगे उपस्थित होते हेमंत रंगराज कुसवाह (वय 24), नथू साधू देशमुख (वय 52, रा. औढोली, मावळ), सुनील शेजवळ (वय 40 रा. घाटकोपर वेस्ट), रवींद्र पवार (वय 42, रा. अंधेरी वेस्ट), शामसुंदर शर्मा (वय 43, रा. गोरेगाव पुर्व), मुकेश राठोड (वय 45, रा. घाटकोपर वेस्ट), सागर धोत्रे (वय 25, रा. हडपसर), प्रशांत उर्फ हेमंत पटेल (वय 27, रा. मध्यप्रदेश), दिनेश अहिरे (वय 38, रा. घाटकोपर), विकास गुरव (वय 34, रा. वाकोला, मुंबई), संजय शेंडगे (वय 47, रा. घाटकोपर), दौलत पटेल (वय 24), विजय पटेल (वय 21), गोविंद कुशवाह (वय 18), प्रदीप धानूक (वय 28, सर्व रा. मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
लोणावळ्यातील प्रधान पार्क सोसायटीत डॉ. खंडेलवाल कुटूंबियासह राहायला असून त्याचठिकाणी त्यांचे रूग्णालय आहे. 17 जूनला पहाटेच्या सुमारास आरोपींनी त्यांच्या घरात प्रवेश करून धाडसी दरोडा टाकला होता. खंडेलवाल दाम्पत्याचे हातपाय बांधून 66 लाख 78 हजारांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुंबईतून 8 जणांना अटक केली होती. त्यानंतर मुख्य आरोपी हेमंत कुसवाह मध्यप्रदेशात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पुणे ग्रामीण तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सुनील जावळे, शब्बीर पठाण, मुकूंद अयाचित, मंगेश थिगळे, बाळासाहेब खडके, मुकेश कदम, प्रकाश वाघमारे, महेश गायकवाड, नीलेश कदम, अक्षय नवले यांच्या पथकाने आरोपींच्या शोधात तीन आठवडे मध्यप्रदेशात तळ ठोकून तपासाला गती दिली. त्यानुसार सागर जिल्ह्यातील विविध ठिकाणी तपास करुन मुख्य आरोपी हेमंत कुसवाहसह 5 जण आणि दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. हेमंत सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूद्ध चार राज्यात घरफोडी, दरोड्याचे गुन्हे असल्याचे उघड झाले आहे. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कॉवत, लोणावळा पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, राजेंद्र थोरात, दत्तात्रय जगताप, विद्याधर निचीत यांनी केली.डॉक्टरांकडे खूप पैसा असल्याच्या अफवेने झाला घोळ डॉ. खंडेलवाल यांच्याकडे खूप पैसा असल्याची अफवा होती. त्यामुळे स्थानिक आरोपींनी मुख्य आरोपीला माहिती दिली. त्यानुसार मुंबईतील फिल्मसिटीत मजूर म्हणून काम करीत असलेला मुख्य आरोपी हेमंत कुसवाह याने इतर साथीदारांना मध्यप्रदेशातून बोलावून घेतले. त्यानंतर आरोपींनी 11 जूनला डॉक्टरांच्या बंगल्याची रेकी केली. त्यानंतर 17 जूनला मध्यरात्री रेल्वेने लोण्यावळ्यात आल्यानंतर त्यांनी दरोडा टाकला. रक्कम लुटल्यानंतर आरोपी मिळेल त्या वाहनाने मुंबईसह मध्यप्रदेशात पसार झाले होते.
दानशूर आरोपींकडून मंदीराला दीड लाखांची देणगी
दरोड्यातील मोठ्या प्रमाणावर मिळालेली रक्कम आरोपींनी वाटून घेतली. त्यानंतर एकाने मध्यप्रदेशातील एका मंदीराला दीड लाखांची देणगी दिली. दुसऱ्या आरोपीने बहिणीचे लग्न करण्यासाठी पैसे खर्च केले. त्याशिवाय काहीही मोबाईल, दुचाकी खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांच्या अथक प्रयत्नातून सराईतासह सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.