पिंपरी चिंचवड, दि.१६ :- मी तुझ्याशी लग्न करणार आहे आणि तु मला धोका दिला तर आत्महत्या करण्याची भीती दाखवत एका तरुणाने महिलेला हॉटेलवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर व्यवसायात भागीदारी म्हणून पाच लाख दहा हजार रुपये महिलेकडून घेतले. त्यानंतर महिलेशी लग्न न करता तसेच व्यवसायात भागीदारी न करता तिची फसवणूक केली. या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 26 नोव्हेंबर 2020 ते 4 फेब्रुवारी 2021 या कालावधीत हिंजवडी आणि वाकड परिसरात घडली.
संग्राम दादासाहेब माळी (वय 28), सुर्यकांत शंकर कदम उर्फ सुरेश बापू (वय 54, दोघे रा. पुसेसावळी, ता. खटाव, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पीडित महिलेने रविवारी (दि.15) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संग्राम याने त्याच्या जीवाची भीती दाखवून पीडित महिलेला हिंजवडी मधील एका हॉटेलवर नेले. तिथे बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. मी तुझ्याशी लग्न करणार आहे. मला व्यवसायात मदत कर, असे आरोपीने सांगून महिलेकडून पाच लाख दहा हजार रुपये घेतले. त्यानंतर तिला पैसे परत न करता तिची फसवणूक केली.पीडित महिलेवर गुन्हा दाखल करून बदनामी करण्याची आरोपीने तीला धमकी दिली. आरोपी सुर्यकांत याने 17 जुलै ते 14 ऑगस्ट 2021 या कालावधीत पीडित महिलेला तिच्या घरातून बाहेर पडण्यास मज्जाव केला. तसेच पीडित महिलेच्या घरी जाऊन तक्रार न देण्यासाठी तिच्यावर दबाव आणला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास मपोउनि बोरकर करीत आहेत.