पुणे दि. १४ :- “खेलो इंडिया” स्पर्धेच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातील खेळाडूंना आपली प्रतिभा दाखविण्यासाठी मोठा मंच उपलब्ध झाला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील हिरे सापडतील, असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज व्यक्त केला. महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडिया युथ गेम्स मधील वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील पदकांचे वितरण पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. श्री बापट यांनी खेलो इंडियातील स्पर्धेतील कबड्डीसह इतर मैदानाला भेट देवून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. तसेच मैदानातील व मैदाना बाहेरील व्यवस्थेची माहिती घेवून पाहणी केली.
पालकमंत्री श्री बापट म्हणाले, खेलो इंडिया स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. या माध्यमातून देशभरातील मुलांना क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. खेलो इंडियामध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना अत्याधुनिक व तंत्रशुध्द प्रशिक्षण उपलब्ध होत आहे. त्यामुळे येणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी हे खेळाडू तयार होवून आपल्या देशाची कामगिरी उंचावेल.
केंद्र सरकारने खेलो इंडिया स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्यामुळे क्रीडा क्षेत्राविषयी चांगले वातावरण राज्यात निर्माण झाले आहे. या वातावरणाचा लाभ राज्यातील मुलांना होईल, तसेच इतर युवकही आता खेळांकडे आकर्षित होतील असा विश्वास व्यक्त करत या स्पर्धेच्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले.