पुणे, दि१९ :- दसर्याच्या दिवशीपुणे शहर पोलीस आयुक्तांनी आयोजित केलेल्या दरबारात विविध पदावरील पोलीस अंमलदार यांनी विनंती बदल्यांबाबत आपली कैफियत मांडली होती.त्याची तातडीने दखल घेत पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ज्या पोलीस अंमलदारांनी बदलीसाठीची विनंती अत्यंत तातडीची आहे, त्यासाठी सर्वसाधारण बदल्या एप्रिलपर्यंत थांबण्याची आवश्यकता नाही. अशा तातडीची बदलीची निकड असलेल्या पोलीस अंमलदारांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा आदेश त्यांनी काढला असून येत्या २३ ऑक्टोबरपर्यंत अंमलदारांना पोलीस मुख्यालयात अर्ज सादर करण्यास सांगितले आहे.पोलिसांच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी पोलीस आयुक्तांकडून दरबारचे आयोजन केले जाते. १४ ऑक्टोबरला दसर्याच्या दिवशी पोलीस मुख्यालयात अशा दरबार चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांना पोलीस अंमलदारांनी आपल्या विनंती बदलीच्या अडचणी सांगितल्या. पोलिसांनी दिलेल्या विनंती अर्ज प्रशासकीय सोयीकरीता दफ्तरी दाखल करण्यात आले आहेत.
ज्या पोलीस अंमलदारांनी बदलीसाठीची विनंती अत्यंत तातडीची आहे. व त्या संदर्भात आगामी सर्वसाधारण बदल्या एप्रिल २२ पर्यंत संबंधित पोलीस अंमलदार यांना प्रतिक्षा करणे अडचणीचे आहे, अशा अत्यंत महत्वाची कारणे असलेल्या पोलीस अंमलदारांचे बदलीबाबतचे विनंती अर्ज नव्याने मागविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सध्य परिस्थितीत अत्यंत महत्वाचे कारण असलेल्या पोलीस अंमलदारांनी पोलीस मुख्यालयात मानव संसाधन विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने यांच्या कडे अर्ज करावे. बदली विनंती अर्ज सबंधित पोलीस अंमलदारांनी २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत व्यक्तिशा करावे. पोलीस अंमलदारांना पोलीस स्टेशन ते पोलीस मुख्यालय व परत पोलीस स्टेशन या ठिकाणी जाणे व येण्याकरीता ४ ते ६ तासांची सवलत प्रभारी अधिकार्यांनी द्यावी. विनंतीचे स्थान २०२१च्या सर्वसाधारण बदलीचे नियमाला अनुसरुन असले पाहिजे.
विनंती बदलीबाबत विहीत नमुना अर्जही जाहीर करण्यात आला आहे.
इच्छुक पोलीस अंमलदार यांनी अर्जातील कारणापृष्ठयर्थ योग्य कागदपत्रे/वैद्यकीय पुरावे सादर करावयाचे आहे. या विनंती अर्जांचा विचार करण्यासाठी पोलीस उपायुक्त आरती बनसोडे , सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने व रुक्मिणी गलांडे यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. समितीचे शिफारशीनंतर प्राप्त विनंती बदली अर्जाबाबत आस्थापना मंडळ उचित निर्णय घेईल, असे या आदेशात म्हटले आहे.