पुणे, दि.०७ :- पुणे शहरातील मुंढवा परिसरातील केशवनगर येथील कुंभारवाडा येथे एका घरामध्ये एका पुरूषासह महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.हा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे.शरद भुजबळ (47, रा. कुंभारवाडा, केशवनगर, मुंढवा, पुणे) आणि हेमा (43 – ही नेपाळी महिला आहे) यांचे मृतदेह आढळून आले आहेत. शरद भुजबळ हा एनआयबीएम रोडवरील एका ट्रव्हल्समध्ये ड्रायव्हर म्हणून कामाला होता. शरद याच्याशी संपर्क होत नसल्याने त्याचा मित्र परवेज आलमने त्याचे घर गाठले. परवेज शरदच्या घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, घरातील गॅस चालू होता पण सिलेंडर संपलेले होते. घराच्या शेजारी केमिकलचे कॅन्ड आढळून आले आहेत. शरद आणि हेमा यांच्या नाकातून रक्त येत असल्याचं देखील पोलिसांना दिसलं आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.मुंढवा परिसरातील घरात पुरूष आणि महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. शरद आणि हेमा यांचा मृत्यू नेमका कशामुळं झालाय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना म्हणजे अपघात की घातपात याचा पोलिस तपास करीत आहेत.