पुणे, दि.२६: – पुणे पीएमआरडीए यांनी भूगाव माताळवाडीफाटा येथील दोन अनधिकृत इमारतींवर धडक कारवाई करीत हातोडा मारला. यात एका इमारतीसह मंगल कार्यालय आहे.अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्याची पीएमआरडीएची पुणे येथील तालुक्यात पहीलीच वेळ आहे.
कोकणाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाजवळ माताळवाडी फाटा येथे सर्व्हे नंबर 29/2 मधील रस्त्यावर रहिवास आणि वाणिज्य प्रयोजनाकरीता आरसीसी बांधकामाची 6400 चौरस फुटाची अनधिकृत इमारत बांधली होती. तसेच गट नंबर 513 मध्येही सौरभ मंगल कार्यालयाचे 8200 चौरस फुटाचे अनधिकृत बांधकाम केले होते. याबाबत दोन्ही इमारतींच्या मालकांना काही दिवसांपूर्वी पीएमआरडीएने नोटीस पाठविल्या होत्या.शुक्रवारी 26 नोव्हेंबर सकाळी पोलिस उपायुक्त निलेश अष्टेकर, पीएमआरडीएच्या तहसिलदार मनिषा तेलभाते यांच्यासह इंजिनिअर आणि पौड पोलिस यांचा ताफा माताळवाडीफाट्यावर आला. त्यांनी पोकलेनच्या सहाय्याने दोन्ही इमारती पाडल्या. अचानक झालेल्या या कारवाईमुळे घटनास्थळी बघ्यांचीही गर्दी जमली होती. दोन्ही इमारतींच्या 14600 चौरस फुटाच्या अवैध बांधकामावर पीएमआरडीएने धडक कारवाई केली. या परिसरातही अवैध बांधकामाविरुद्ध पीएमआरडीएने कारवाई केली. कारवाईची ही मोहीम अशीच सुरू राहणार असून यापुढे कोणीही विनापरवाना बांधकाम करू नये असे आवाहन तहसिलदार मनिषा तेलभाते यांनी केले आहे.