समज गैरसमज दूर करत ‘त्या’ बहुचर्चित तरुण शेतकऱ्याचे अखेर केले काम
कर्जत दि.२२:- ‘आज मला या जगाचा निरोप घ्यावा लागत आहे…माझ्या कुटुंबावर मोठा अन्याय झाला आहे…आमची जमीन बळकावली आहे…वैतागून मला आत्महत्येला प्रवृत्त केले आहे…मी कुठेतरी लटकलेली बातमी येईल…एकांतात जाऊन निरोप घेतो!’
या आशयाची पोस्ट सोशल मिडियाच्या फेसबुक अन् व्हाट्सअपवर त्याने सकाळी ६ वाजता शेअर करत मोबाईल बंद केला. अतुल पोपट सुपेकर (रा.कुळधरण ता.कर्जत) असं या तरुण शेतकऱ्याचं नाव. काहीच क्षणात या पोस्टने संपुर्ण तालुक्यातच नव्हे तर फेसबुकर असलेल्या हजारो मित्र परीवारामध्ये खळबळ उडवली.विपरीत घटना घडू नये म्हणुन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गांभीर्य लक्षात घेत तात्काळ पोलीस पथक रवाना केले.पोलीस, नागरिक,कुटुंबीयांकडुन त्या परिसराची शोधाशोध सुरू झाली.मोबाईल लोकेशन लावण्यात आले.शेत,झाडे, विहिरी,तलाव हे सगळं शोधण्यात आलं.वेळ जात होता तशी प्रत्येकाची चिंता-काळजी वाढतच होती. करायचं तरी काय? सगळ्यांची डोकी बंद पडली.मास्टर माईंड चंद्रशेखर यादव यांच्या अकलेचे तारे चमकले त्यांनी एक शक्कल लढवली व अतुल सुपेकरने केलेल्या खळबळजनक फेसबुक पोस्टवर ‘आपण अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावत आलो आहोत.त्यांना न्याय मिळवून देत आहोत.याबाबत चर्चा करू हा प्रश्न मी मार्गी लावतो तु असा अविचार मनात आणू नकोस’ अशी कमेंट केली.यादव यांच्या या पोस्टचे समर्थन करत अनेकांनी लाईक केले.यादव यांची शक्कल कामी आली आणि काही वेळात चक्क अतुलने पोलीस निरीक्षक यादव यांना संपर्क साधुन सुखरूप असल्याचे कळवले.’कुठे आहेस?मी तुला न्यायला येतो’ असे विचारून पत्ता विचारून घेतला.श्रीगोंदा येथील मढे वडगाव या गावी कॅनलच्या चारीला एकांतात असलेल्या ठिकाणावर तात्काळ श्रीगोंदा येथील पोलीस पाठवून अतुल यास ताब्यात घेण्यात आले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.अतुलचा शोध लागला खरा मात्र आता वेळ आली होती ती दिलेला शब्द पाळण्याची!यादव यांनी जमिनीचा वाद असलेल्या दोन्ही गटाला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.’आता मला सांगा, जमीन,धन-दौलत,पैसा तुमच्या रक्ताच्या नात्यांपेक्षा कधी मोठा झाला?जाताना सगळं इथंच ठेऊन जायचं आहे.नाती जपा, माणुसकी टिकवा, प्रेम वाढवा असा त्यांनी युक्तिवाद केला.सवाल-जवाब झाले दोन्ही गटाची सकारात्मक चर्चाही झाली.गावचे पोलीस पाटील आणि पदाधिकारी यांनीही खूप चांगली भूमिका निभावली.अतुल याच्या हिश्श्याची जमीन त्याच्या नावावर करून देण्याचे ठरले.जमीन नावावरही झाली यादव यांनी अतुलला दिलेला शब्द पाळत समज गैरसमज दूर केले.अतुल सुपेकर व त्याच्या कुटुंबीयांनी चंद्रशेखर यादव यांची पोलीस ठाण्याच्या पुढेच भेट घेतली त्यांचा हा आनंद त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूनी दिसत होता. त्यांनी भेटून सत्कार केला व कर्जत पोलीसांचे आभार मानले.चंद्रशेखर यादव आप सच मे मरते दम तक ‘याद’ राहोगे जणु असाच प्रसंग निर्माण झाला होता.त्यांचा हा आनंद पाहून यादवही गहिवरले.सत्कार स्विकारत आणखी एका सन्मानाची शाल हातात घेऊन त्यांनी पोलीस ठाण्याच्या दिशेने पाऊले टाकली. काही पोलीस कर्मचारी हा सर्व प्रसंग पहात होते.त्यांनी दिलेला हा ‘सॅल्युट’ एका कृतीशील,दबंग आणि तितक्याच हळव्या अधिकाऱ्याचा गौरव करणारा होता. अशा अनेक अतुलनीय कार्यामुळे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व कर्जत पोलिस सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनुन राहिले आहेत हे मात्र खरे!
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षकसो मनोज पाटील अहमदनगर जिल्हा, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार सुनील माळशीखरे, भाऊसाहेब यमगर,विकास चंदन,श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे अमोल आजबे, दादा टाके, योगेश सुपेकर व झुंजार न्युज प्रतिनिधी विजय मांडे यांनी केली.त्यावेळी कुळधरणचे नागरिक समीर पाटील, मंगेश पाटील, संदीप सुपेकर, विजय तोरडमल, किरण जगताप, दत्तात्रय सुपेकर, गौतम सुपेकर, रमेश सुपेकर, सतीश सुपेकर यांनी योग्य भूमिका घेत मदत केली.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे