पुणे,दि.२३ :- पुणे शहरात घडत असलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करावा व दाखल गुन्हे उघडकीस आणावेत अशा सुचना पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या होत्या व पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा 4 युनिट चारच्या पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली आहे.हे चोरटे उत्तर प्रदेशातून चोरी करण्यासाठी चक्क विमानाने पुणे शहरात येत होते आणि चोरी केल्यानंतर तात्काळ पुन्हा विमानाने उत्तर प्रदेशात जात होते. पोलिसांनी दोघांना अटक करुन त्यांच्याकडून दोन गुन्ह्यातील 6 लाख 37 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.परवेज शेर मोहम्मद खान (वय -43 रा.एस.पी.जी. गल्ली नं.2 जवळ, सुरजपूर, देवला, ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश), तस्लीम आरिफ समशुल खान (वय-23 रा. मु.पो. धुमरी, ता. अलीगंज, जी. ऐटा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. परवेश खान याच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये 9 तर तस्लीम खान याच्यावर दिल्ली येथे 3 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून गुन्ह्यातील 6 लाख 37 हजार रुपये किमतीचे 130 ग्रॅम सोने जप्त केले आहे.गुन्हे शाखा युनिट चार चे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी दोन संशयित लोहगाव येथील 509 चौकात थांबले असून त्यांनी विश्रांतवाडी आणि धानोरी परिसरात घरफोड्या केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर करुन त्यांची पोलीस कोठडी घेऊन सखोल चौकशी केली. चौकशीमध्ये त्यांनी वानवडी येथे घरफोडी केल्याची कबुली दिली.अशी करत होते चोरी आरोपी परवेज खान हा कपडे विक्री करतो. दोघेही सराईत गुन्हेगार असून ते वॉचमन नसलेल्या सोसायटीची रेकी करत होते. ज्या ठिकाणी वॉचमन नाही त्या इमारतीत ते चोरी करत होते. चोरी करण्यासाठी उत्तर प्रदेशातून विमानाने पुण्यात येत होते. चोरी केल्यानंतर लगेच पुन्हा विमानाने उत्तर प्रदेशला निघून जात होते. सदर
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, महेंद्र पवार, राजस शेख,राकेश खुणवे, संजय आढारी, प्रविण भालचिम, विशाल शिर्के, दत्ता फुलसुंदर, अशोक शेलार, रमेश राठोड यांच्या पथकाने केली.