पिंपरी चिंचवड,दि.०५ :- कृष्णाई पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत टोळी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने डाव उधळून लावला. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.त्यांच्याकडून पिस्टल, जिवंत काडतुसे तसेच दरोड्याचे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 3) रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास वडमुखवाडी च-होली येथील कृष्णाई पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली.आकाश अनिल मिसाळ (वय 21, रा. इंद्रायणी नगर, भोसरी), रुपेश सुरेश पाटील (वय 30, रा. वडगाव बुद्रुक, ता. चोपडा, जि. जळगाव), ऋतिक दिलीप तापकीर (वय 26, रा. सुतारवाडी, पाषाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह करण, सनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक सागर शेडगे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडमुखवाडी येथील कृष्णाई पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. याबाबतची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी तात्काळ पेट्रोल पंप परिसरात सापळा लावून या टोळीचा दरोड्याचा डाव उधळला.तसेच तिघांना ताब्यात घेत या आरोपींकडून एक दुचाकी, दोन पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, तीन मोबाईल फोन, मिरची पूड व नायलॉन दोरी असा एकूण 1 लाख 51 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दरम्यान त्यांचे दोन साथीदार पळून गेले.पुढील तपास पोउनि भांगे करीत आहेत.