पुणे, दि.०५: – साहिर लुधयानवी यांनी माणसांची गाणी लिहिली त्यातून मानवी मूल्यांचे तत्त्वज्ञान उभे केले, असे मत गीतकार-पटकथाकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.
‘पीव्हीआर आयकॉन’ चित्रपटगृहामध्ये २० व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (‘पिफ २०२२’) विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानामध्ये अख्तर बोलत होते. चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यावेळी उपस्थित होते.
अख्तर म्हणाले, “साहिर लुधियानवी यांनी आपल्या गीतांमधून सामान्य माणसाला मध्यवर्ती ठेवले आणि त्यांनी आपल्या प्रेम गीतांमध्ये निसर्गाला सामावून त्यांनी घेतले. त्यामुळे त्या गोष्टींना मोठा आयाम मिळायचा. त्यातून नवे विचार यायचे. शैलेंद्र, साहिर हे केवळ गीतकार नव्हे तर लोकांचे तत्त्वज्ञ होते.”
अख्तर पुढे म्हणाले, की साहिर हे एका वेगळ्याच धाटणीचे होते. साधेपणा, हुशारी, सर्जनशीलता या गोष्टी उत्तम लेखक म्हणून तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. हे सगळे साहिर यांच्याकडे होते. तुमच्या भावना प्रामाणिक असतील, हृदयातून निघालेल्या गोष्टी असतील तर त्या लोकांना प्रभावित करतात. कामामध्ये गुणवत्ता असणे गरजेचे असते, जे साहिर यांनी कामातून दाखवले. त्यांच्या कविता आणि चित्रपटातील गाणी एकमेकांपासून अजिबात वेगळी नव्हती. त्यांच्या कविता आणि साहित्य हे चित्रपटातील गाणी झाली.
“साहिर आणि त्या काळातले अनेक लेखक हे एका तत्त्वज्ञानातून आले होते. साहिर मुन्शी प्रेमचंद यांनी स्थापन केलेल्या आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या मार्गदर्शन लाभलेल्या प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनमध्ये होते. या संघटनेतून जे लेखक, कवी आले त्यांनी विषमता, गुलामी आणि वसाहतवाद यांच्याविरुद्ध लेखणी चालवायची शपथ घेतली. त्यातून प्रेम आणि मानवतेच्या कविता, गाणी निर्माण झाली”, असे अख्तर म्हणाले.
विजय तेंडुलकर यांच्या नावाने आपण जुहूमध्ये खासदार निधीतून रंगमंच तयार केल्याचे सांगून अख्तर म्हणाले, “आम्हाला पूर्वी असे असे वाटायचे हिंदी, उर्दू आणि बंगाली याच समृद्ध भाषा आहेत. पण मी जेंव्हा ‘गिधाडे’ हे नाटक बघितले तेंव्हा माझे डोळे उघडले. जे मराठीत होते, ते खूप पुढचे सांगणारे होते. भाषा ही संवाद साधण्यासाठी असून सुद्धा कधी कधी तीच संवादामधील भिंत बनते. त्यामुळे आपण इतर भाषांमध्ये काय चालले आहे, हे पहिले पाहिजे. विजय तेंडुलक अतिशय सभ्य, शांत मृदू स्वभावाचे होते पण त्यांनी स्वभावाच्या विपरीत नाटके लिहिली. त्यांच्या लेखनातून आग यायची. तेंडुलकर, इस्मत चुगताई, कृष्ण चंद्र हे भारतातील खूप मोठे लेखक-नाटककार होते.”
अख्तर म्हणाले, की खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये माणूस व्यक्तिवादी झाला आहे. आपण समाज म्हणून एकत्र असण्याचे दिवस गेले आहेत. लोकांचे दुःख स्वीकारण्याचे एक मूल्य होते. ते मूल्य आता समाज म्हणूनच मागे गेले आहे. आताची मूल्य व्यवस्थाच बदलली आहे. समाजाचा प्रभाव चित्रपटांवर खूप पडला आहे. आत्ताच्या चित्रपटांमध्ये दुःखाची गाणी नसतात. सगळे काही ठीक असल्याचे दाखवले जात आहे. समाज एक प्रकारच्या दिखाव्यामध्ये जगत आहे.
या व्याख्यानाला युवा-युवतींनी मोठा प्रतिसाद दिला आणि जावेद अख्तर यांना विविध विषयांवर प्रश्न विचारून बोलते केले.