कर्जत दि.२८ :-भांबोरे येथील भीमा नदीच्या फुगवठ्यावर लोहकरा ओढ्यालगत असणाऱ्या इलेक्ट्रिक मोटारींमधील तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांच्या कर्जत पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.आणखी ३ चोरटे फरार आहेत.आसमानताऱ्या उर्फ नितीन सुलाख्या चव्हाण (वय ४५) शुभम आसमानताऱ्या उर्फ नितीन चव्हाण (वय २१) दोन्हीही (रा.कोरेवस्ती,भांबोरा ता.कर्जत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून तांब्याच्या तारा आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा 75,000 रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार भांबोरे (ता.कर्जत) परिसरात भीमा नदीच्या फुगवठ्यावर लोहकरा ओढ्यावर लावण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटारींमधील तांब्याच्या तारा काढून त्या लंपास करण्याचा चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्याबाबत भांबोरे येथील शेतकरी गणेश जगताप यांच्या १० एच.पी. , परमेश्वर लोंढे यांच्या ५ एच.पी. तर अरुण लोंढेयांची ५ एच.पी. व इतर अशा एकाचवेळी 7 शेतीपंपाच्या इलेक्ट्रिक मोटारीतील तांब्याच्या तारांची (दि.१९ मार्च) रोजी रात्री चोरी झाल्याच्या एकाच वेळी चार फिर्यादी कर्जत पोलिसात दाखल झाल्या होत्या. दररोजच्या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे शेतीसाठी रात्री ११ वाजेपर्यंत या भागासाठी विजपुरवठा देण्यात येतो त्यानंतर रात्रभर वीजपुरवठा खंडित होतो याचाच फायदा घेत चोरट्यांनी एकाच रात्रीत सात मोटारींमधील तांब्याच्या तारा काढून पलायन केले होते. याअगोदरही राशीन परिसरातील वेगवेगळ्या कंपनीच्या ५ इलेक्ट्रिक मोटारी जप्त करून आरोपींना अटक करण्यात कर्जत पोलिसांना यश आले होते. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी कर्जत पोलिसांकडे तक्रारी आल्यानंतर या चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी कर्जत पोलीस लक्ष ठेऊन होते. अटक आरोपींना पाच दिवसांचा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे,पोलीस उप निरीक्षक भगवान शिरसठ, स.फौ.तुळशीदास सातपुते, पोलीस नाईक संभाजी वाबळे,पो.हे.कॉ.आण्णासाहेब चव्हाण, पो.कॉ.भाऊसाहेब काळे,अर्जुन पोकळे, संपत शिंदे आदींच्या पथकाने केली आहे.
“संबंधित टोळीने याअगोदरही अनेक गुन्हे केले आहेत. त्यामुळे कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीबाबत कर्जत पोलीस कसून तपास करत आहेत” -चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक कर्जत