_दादा पाटील महाविद्यालयात ‘विद्यार्थी-विद्यार्थिनी जाणीव जागृती’ कार्यक्रमात मार्गदर्शन_
कर्जत दि.२३:- ‘महिला व मुलींना त्रास द्यायचा व त्यांची छेडछाड काढण्याचा कुणी चुकूनही प्रयत्न करायचा नाही.अन्यथा अशांची कसलीच गय करणार नाही.मुलींनीही निर्भय होऊन त्रास देणाऱ्याची तक्रार करावी,तक्रारदाराचे नाव गुप्त ठेऊन त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करू.आपल्या बहिणीची आपण जशी काळजी घेतो तशीच काळजी इतर मुलींच्या बाबतही प्रत्येकाने घ्यायला हवी.आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचीही प्रत्येकाने जाणीव ठेवावी’ असे प्रतिपादन कर्जतचे कृतिशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले.
कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’ व ‘कर्जत पोलीस स्टेशन’ यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘विद्यार्थी-विद्यार्थिनी जाणीव जागृती’ कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर हे होते. चंद्रशेखर यादव पुढे म्हणाले,’गुन्हेगारालाच पोलिसांची भीती वाटत असते.एखाद्या विद्यार्थ्यावर महिला व मुलींबाबत गुन्हा दाखल झाल्यास त्याचे करिअर बरबाद होऊ शकते, समाजात त्याची व कुटुंबाची बदनामी होऊ शकते.त्यामुळे वायफळ वागणाऱ्या विद्यार्थ्यांनी याची दक्षता घ्यावी. सेल्फी कोणासोबत काढावा, ‘सोशल मीडियावर कसा शेअर करावा अथवा करू नये यावर ही चर्चा झाली. मोबाईलचा वापर हा विघातक कृत्यांसाठी न करता चांगला संवाद साधण्यासाठी आणि ज्ञान मिळवण्यासाठी करावा असा सल्ला दिला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नगरकर म्हणाले,’अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा हा अधिक दोषी असतो.अन्याय सहन करत राहिल्याने गुन्हेगाराचे धाडस वाढते.त्याचा अधिक त्रास होत राहतो.त्यामुळे वेळीच पायबंद घातल्यास गुन्हेगारीस आळा बसतो. तेव्हा मुलींनी कोणाचा त्रास होत असेल तर वेळीच पोलिसांकडे तक्रार करावी आणि गुन्हेगारांना वेळीच रोखावे.
या कार्यक्रमात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पोलीस निरीक्षकांना लेखी स्वरुपात अनेक प्रश्न विचारले त्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रा.भागवत यादव,ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य मोहनराव खंडागळे,डॉ.माधुरी गुळवे, पोलीस अंमलदार मनोज लातूरकर, जयश्री गायकवाड, राणी व्यवहारे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य भास्कर मोरे यांनी तर सुत्रसंचालन डॉ.प्रतिमा पवार यांनी केले. तर तक्रार निवारण समितीच्या प्रमुख डॉ.सुमन पवार यांनी आभार मानले.
शाळा -महाविद्यालयात ‘यादवांची’ जनजागृती मोहीम!
तालुक्यातील अनेक शाळा-महाविद्यालयात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी जनजागृती मोहीम घेऊन हजारो मुलींना मार्गदर्शन केले आहे. पोलीस स्टेशनबाबत असलेली त्यांची भीती दूर केली आहे. पोलीस ठाण्याचे कामकाज कसे असते? तक्रार कशी करावी?तक्रार कोठे करावी? यासाठी चक्क पोलीस ठाण्यातच सहलींचे आयोजन केलेले आहे.
अनेक तक्रारींचा निपटारा होऊन मुलींना न्याय!
मुली महिलांना सन्मानाने शाळा महाविद्यालयात जाता यावे,त्यांना कुठेही,कुणाचाही त्रास होऊ नये यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले.त्यांना तक्रारीसाठी पोलीस ठाण्याबरोबरच वैयक्तिक मोबाईल नंबरही उपलब्ध करून देण्यात आला. आता मुलींना त्रास दिल्याच्या अनेक तक्रारी दाखल होत आहेत आणि विशेष म्हणजे अशा त्रास देणाऱ्या मजणूंना पोलिसी खाक्या दाखवून कुठेही चर्चा न करता मुलींना न्याय मिळवून दिला जात आहे हे विशेष!