नवी दिल्ली,दि.१२ :- महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी १० जून २०२२ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख ३१ मे आहे.
भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह १५ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण ५७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला .
महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार सर्वश्री पियुष गोयल, पी.चिदंबरम, प्रफुल्ल पटेल,डॉ. विकास महात्मे, संजय राऊत आणि डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांचा कार्यकाळ ४ जुलै २०२२ रोजी संपत असल्याने राज्यातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण ५७ जागांसाठी १० जून २०२२ ला निवडणूक घेण्यात येणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
या निवडणुकांसाठी २४ मे रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. ३१ मे ही अर्ज करण्याची अंतिम तारिख असून १ जून रोजी अर्जांची छाननी होणार. ३ जून पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. १० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मदतदान होणार असून सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. १३ जून २०२२ रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.