नाशिक,दि.१६ :- नाशिक शहरात काही दिवसांमध्ये स्ट्रीट क्राईम वाढल्याने खडबडून जाग आलेल्या नाशिक शहर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.विशेषतः सिडको, सातपूर, पंचवटी आणि नाशिक रोड भागात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून खून, प्राणघातक हल्ले, हाणामाऱ्या, लुटमारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे शहर पोलिसांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले होते.
तसेच, सिडको, सातपूर, पंचवटी आणि नाशिक रोड या परिसरात रात्री उशिरापर्यंत चायनीज गाडे, हॉटेल्स सुरू असतात. पोलिसांनी रात्री दहा वाजेनंतर परवानगी असलेले हॉटेल्स वगळता चायनीज व आंडा भुर्जी व इतर गाड्यांसह हॉटेल्स, दुकानांना बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत.
असे असतानाही नियम डावलून व्यवसाय सुरू असल्याची बाब पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने, पोलिस ठाणेनिहाय निर्धारित वेळेनंतरही व्यवसाय सुरू ठेवणाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश बजावले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अशा व्यावसायिकांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
उपनगरी परिसरामध्ये असलेल्या चायनीज गाड्यांवर टवाळखोरांकडून मद्यपान केले जात असल्याचे सर्रासपणे दिसून येते. टवाळखोर बाहेरून मद्याच्या बाटल्या आणून चायनीज गाड्याजवळ पीत बसतात. यातून अनेकदा वादावादी व हाणामारीचेही प्रकार घडलेले आहेत, तर गेल्यावर्षी सिडकोत खूनही झाला होता. मात्र, तरीही पोलिसांकडून अशा व्यावसायिकांकडे दुर्लक्ष केले गेले. मात्र, आता नाशिक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे.