पुणे,दि.०१:- प्रत्येक रुग्णाला बरे करण्याचे काम सर्वच डॉक्टर करीत असतात, त्यामुळेच त्यांना देवदूतही मानले जाते. करोना काळात हजारो डॉक्टरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लाखो नागरिकांना करोना पासून वाचवले याबद्दल सारा समाज डॉक्टरांचा ऋणी आहे. डॉक्टरांना समाजमाउली म्हणणेच योग्य ठरेल असे उद्गार पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आज काढले. दिनांक 1 जुलै 2022 ‘जागतिक डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने पुण्यातील ताराचंद हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवक कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सचिव डॉ. वैष्णवी देवेंद्र किराड यांनी याचे आयोजन केले होते.
याप्रसंगी सर्व डॉक्टरांना शुभेच्छा देऊन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. अभय छाजेड म्हणाले की, ‘आजारी पडल्यावर औषधोपचार करणारे डॉक्टर्स हे गरीब अथवा श्रीमंत असे भेद न करता रुग्णसेवा करीत असतात. करोना काळात डॉक्टरांनी केलेले कार्य प्रशंसनीय आहे. योग्य आहार, व्यायाम, व्यसनमुक्ती यांवर भर देऊन नागरिक आजारी पडू नयेत यासाठी देखील अनेक डॉक्टर काम करतांना दिसतात. प्रत्येकांनी आई, वडील व शिक्षकांप्रमाणेच डॉक्टरांनाही वंदनीय मानले पाहिजेत’ असे सांगून पुनः फॅमिली डॉक्टर ही संकल्पना रुजली पाहिजे असे ते म्हणाले.
याप्रसंगी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी डॉक्टरांचे महत्व विषद करून म्हटले की, ‘आपल्या देशात गेल्या ७५ वर्षात डॉक्टरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली व त्यामुळेच सामाज्याचे आयुष्यमानही वाढले ही महत्त्वाची बाब आहे.’
कॉंग्रेस पक्षाचे मेहबूब नदाफ यांनी देखील याप्रसंगी डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी संयोजिका डॉ. वैष्णवी देवेंद्र किराड यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले व डॉक्टर्स डे ची माहिती सांगितली. ताराचंद हॉस्पिटलच्या उपअधिक्षक डॉ. कल्याणी भट्ट यांनी ताराचंद हॉस्पिटलच्या स्थापने पासून करीत असलेल्या रुग्णसेवेची माहिती दिली. याप्रसंगी विशेष सामाजिक योगदान देणाऱ्या डॉक्टरांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमास डॉक्टरांची मोठी उपस्थिती होती.