पुणे, दि.०९ :- निवडणूक, लोकशाही, मताधिकाराचे आणि मतदार नोंदणीचे महत्त्व आदी विषयांवर जनजागृतीची परंपरा सुरू ठेवण्यासाठी गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयालयाच्यावतीने ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयावर घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यावतीने देण्यात आली.
या स्पर्धेमध्ये अभिनव कल्पना राबवत मताधिकाराचे आणि मतदार नोंदणीचे महत्त्व, मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडणे हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गणेश-मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरूकता करता येईल.
मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर सजावटीतून जागृती करता येऊ शकते. स्पर्धेची नियमावली मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in आणि समाजमाध्यमांवर देण्यात आलेली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून गणेश मंडळांनी आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धकांनी ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीतच https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7 या गुगल अर्जावरील माहिती भरून देखावा, सजावटीचे साहित्य पाठवायचे आहे.
स्पर्धेची नियमावली :
स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकाने मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही या विषयाला अनुसरून केलेल्या सजावटीचे विविध कोनांतून काढलेले पाच छायाचित्रे पाठवावीत. प्रत्येक छायाचित्र जास्तीत-जास्त ५ एमबी आकाराचे व जेपीजी फॉरमॅटमध्येच असावे. घरगुती गणेशोत्सव सजावटीची ध्वनीचित्रफीत (व्हिडीओ) जास्तीत जास्त १०० एमबी आकाराची, एमपी ४ फॉरमॅटमध्ये व एक ते दोन मिनिटांची असावी. ध्वनीचित्रफीत आणि छायाचित्रे अपलोड करताना त्यावर स्पर्धकाचे नाव येणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा अर्ज स्पर्धेतून बाद केला जाईल. चित्रफीतीला आवाजाची जोड (व्हॉईस ओव्हर) देता येईल.
गणेश मंडळांनीही ध्वनीचित्रफीत आणि छायाचित्रे अपलोड करताना त्यावर मंडळाचे किंवा मंडळातील व्यक्तीचे नाव, लोगो येणार नाही याची काळजी घ्यावी. गणेश मंडळांची सजावटीची ध्वनीचित्रफीत (व्हिडीओ) जास्तीत जास्त ५०० एमबी आकाराची, एमपी ४ फॉरमॅटमध्ये व १० मिनिटांपर्यंत असावी, आदी अटी ठेवण्यात आल्या आहेत. फोटो किंवा चित्रफीत (व्हिडिओ) अपलोड करण्यास अडचण आल्यास प्रणव सलगरकर – ८६६९०५८३२५ आणि तुषार पवार- ९९८७९७५५५३ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवून कळवावे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पहिल्या क्रमांकाचे बक्षिस ५१ हजार रुपये, दुसरा क्रमांक २१ हजार रुपये तर तिसऱ्या क्रमांकासाठी ११ हजार रुपये आणि उत्तेजनार्थ ५ हजार रुपयांची दहा बक्षिसे असतील. तर घरगुती गणेशोत्सव सजावटीसाठी पहिल्या क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे, दुसरा क्रमांक ७ हजार रुपये आणि तिसरा क्रमांक ५ हजार रुपये तर १ हजार रुपयांची दहा उत्तेजनार्थ बक्षिसे असतील.
स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी सदर स्पर्धकाची असेल. निवडणूक कार्यालयास कार्यरत अधिकारी, कर्मचारी स्पर्धेत भाग घेऊ शकतात, मात्र त्यांचा बक्षिसासाठी विचार होणार नाही. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल.
स्पर्धेविषयी अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि गुगल फॉर्ममध्ये देण्यात आली आहे, असेही कळवण्यात आले आहे.