पुणे,दि.०३ :- विविध आजारांशी झुंज देत रुग्णालयाच्या खाटेवर उपचार घेत असलेले रुग्ण परमेश्वराकडे आपण लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करतात. ऐन गणेशोत्सवात आपण गणरायासमोर जाऊन नतमस्तक व्हावे, ही इच्छा सामान्यांप्रमाणे या रुग्णांची देखील असते. मात्र, आजारपणामुळे त्यांना रुग्णालयातील खाटेवरुन कोठेही जाता येत नाही. त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन त्यांना रुग्णालयात, ते आहेत, त्या विभागमध्ये, त्यांच्या खाटेवर बसून देण्याची सोय करण्यात आली आहे. यामुळे ते रुग्ण प्रत्यक्षपणे उत्सवमंडपात आहेत आणि गणरायाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत असल्याचा भास त्यांना होत आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे १३० व्या वर्षी गणेशोत्सवात हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. आॅगमेंटेड आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी स्टार्टअप – डिजिटल आर्ट व्हीआरई यांनी या उपक्रमाकरिता सहकार्य केले आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयातील आयसीयू मधील रुग्णांना हे दर्शन घडविण्यापासून या उपक्रमाला प्रारंभ झाला. ससून रुग्णालयातील रुग्णांना बाप्पाचे यामाध्यमातून दर्शन घेताना आनंदाश्रू अनावर झाले.
ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, मानवसेवेच्या महामंदिराकडे पुढची पायरी या उपक्रमाद्वारे चढण्याचा हा प्रयत्न आहे. पुणे शहरातील १५ रुग्णालयांमधील अंदाजे ५०० रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा ट्रस्टचा मानस आहे. याबाबत संबंधित अधिकारी आणि डॉक्टरांच्या विशेष परवानग्या घेतल्या आहेत, ज्यांनी आम्हाला उत्सवाच्या या दहा दिवसांमध्ये हा अनुभव देण्यास अनुमती दिली आहे. यामुळे रुग्णांना वेगळी उर्जा व समाधान मिळणार असून बाप्पाचा हा दर्शनरुपी प्रसाद, ट्रस्ट त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे. कोविडमुळे निर्माण झालेले भय व नैराश्य दूर होऊन यामाध्यमातून रुग्णांचे मनोबल वाढण्यास मदत होईल.
ससून रुग्णालयात उपचार घेणारे पनवेल येथील ८७ वर्षांचे रुग्ण प्रभाकर डिंगोरकर म्हणाले, उद्याची चिंता, नकारात्मकता आमच्यासारख्या रुग्णांमध्ये नेहमी असते. मात्र, आज सकल विघ्नहर्ता गणरायाचे दर्शन झाले. जेव्हा मला भगवंताचे दर्शन झाले आणि आरती, सजावट पहायला मिळाली, त्यावेळी नकळत अशी उर्जा आली, ज्यामुळे मी लवकर बरा होईन आणि मला लवकर घरी जाता येईल. असे नवनवीन प्रयोग ट्रस्टने आम्हा रुग्णांसाठी राबवावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
डिजिटल आर्ट व्हीआरई चे संस्थापक संचालक अजय पारगे म्हणाले, गणपती बाप्पा मेटाव्हर्समध्ये असतील आणि आरोग्याच्या स्थितीनुसार काही रुग्ण आभासी माध्यमाद्वारे बाप्पासमोर उभे राहून आरती करू शकतील. हे रुग्ण इतर भक्तांच्या शेजारी उभे राहून जप करताना आणि अभिषेक करतानाही पाहतील. त्यामुळे त्यांना बसल्याजागी बाप्पासाठी केलेली सजावट व प्रत्यक्ष दर्शन घेण्याचा अनुभव मिळणार आहे.
मिडीया अँड एंटरटेनमेंट स्किल कौन्सिलचे सीईओ मोहित सोनी म्हणाले, डिजिटल आर्ट व्हीआरईच्या या उदात्त उपक्रमाशी जोडल्याचा आम्हाला आनंद होत आहे. आम्ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा नवकल्पनांना प्रोत्साहन देऊ, असेही त्यांनी सांगितले.