मुंबई,दि.०६:- अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी विजय संपादन केला आहे. भाजपाने या निवडणुकीत माघार घेतली होती. याच कारणामुळे लटके यांचा विजय जवळजवळ निश्चितच मानला जात होता. मात्र लटके यांचा विजय झालेला असला तरी या निवडणुकीत ‘नोटा’ला जवळजवळ १२८०६ मतं पडली आहेत. याच कारणामुळे उद्धव ठाकरे गटातील नेते अनिल परब यांनी भाजपावर टीका केली आहे. भाजपाने आपला उमेदवार मागे घेतला, पण नोटाला मतदान करा, असा प्रचार त्यांनी केला, असा आरोप अनिल परब यांनी केला. ते ‘पत्रकारांशी बोलत होते.महाराष्ट्राची परंपरा, भारतीय संस्कृतीचा आम्हीदेखील आदर करतो. भाजपाने माघार घेतल्यानंतर आमच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी तसेच मीदेखील त्यांचे आभार मानले होते. पण या निवडणुकीत नोटाचा प्रचार केला गेला. माघार घेऊन लटके यांना पाठिंबा दिला असता तर काहीही अडचण नव्हती. त्यांनी माघार घेतली होती, मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांना ‘नोटा’चा प्रचार केला, असे परब म्हणाले.मी या कार्यकर्त्यांची नावंदेखील दिली होती. पक्षाच्या नेत्यांनी या कार्यकर्त्यांना तशी समज द्यायला हवी होती. मात्र तसे केले गेले नाही. भाजपाने ऋतुजा लटके यांना पाठिंबा जाहीर केलेला नव्हता. एकीकडे सहानुभूती आणि दुसरीकडे नोटाचा प्रचार, अशी मोहीम भाजपाने राबवली, असा थेट आरोपही परब यांनी केला.
१८ व्या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली एकूण मते खालील प्रमाणे :
१) श्रीमती ऋतुजा लटके- ६६६३०
२) श्री.बाला नाडार – १५१५
३) श्री.मनोज नायक – ९००
४) श्रीमती नीना खेडेकर- १५३१
५) श्रीमती फरहाना सय्यद- १०९३
६) श्री.मिलिंद कांबळे- ६२४
७) श्री.राजेश त्रिपाठी- १५७१
आणि
नोटा – १२८०६
एकूण मते : ८६५७०