पुणे,दि.०२ :-शिवाजीनगर न्यायालयातील केसमधून सुटका करण्यासाठी न्यायाधीशांना सांगून मदत करण्यासाठी व निकाल मार्गी लावण्यासाठी २ लाखांची लाच मागून त्यापैकी दीड लाख रुपये लाच स्वीकारताना शिवाजीनगर न्यायालयातील वरिष्ठ लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आले.
सचिन अशोक देठे (वय ३९, रा. राजगुरुनगर, खेड- असे या वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. शिवाजीनगर कोर्टाबाहेरील गणेश झेरॉक्स या दुकानासमोर गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजता ही कारवाई करण्यात आली.
याबाबतची अधिक माहिती अशी, एका २३ वर्षाच्या विद्यार्थ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.त्यांच्या मावसभावाविरुद्ध शिवाजीनगर न्यायालयात खटला सुरु आहे. या खटल्यातून सुटका करण्यासाठी न्यायाधीशांना सांगून मदत करण्यासाठी व निकाल मार्गी लावण्यासाठी शिवाजीनगर सत्र न्यायालयातील क्लार्क सचिन देठे यांच्याकडे ३० नोव्हेबर रोजी २ लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्याची पडताळणी केली, त्यात देठे याने दीड लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर गुरुवारी रात्री शिवाजीनगर न्यायालयाबाहेर सापळा लावण्यात आला. तक्रारदार याच्याकडून दीड लाख रुपये स्वीकारताना देठे याला पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ज्योती पाटील अधिक तपास करीत आहेत.