पुणे,दि.०८:- मित्र-मैत्रिणींसोबत पाषाण येथील शिवनगरमधील राऊंड द क्लॉक कॅफेम हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करीत असलेल्या १६ वर्षांच्या युवतीला लग्नाची मागणी घालून ‘तू माझी नाही झाली, तर कोणाची होऊ देणार नाही,’ असे बोलून तोंडावर अॅसिड फेकण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी एका युवतीने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पाषाण येथील द क्लॉक कॅफेम हॉटेलमध्ये समवारी सायंकाळी घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा फिर्यादीच्या ओळखीचा आहे. त्या हॉटेलमध्ये मैत्रिणीसह वाढदिवस साजरा करण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी तो मित्रांसह तेथे आला.त्याने फिर्यादीचा हात धरून ‘हॉटेलच्या बाहेर चल, तुझ्याशी बोलायचे आहे,’ असे म्हणत बाहेर ओढून फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादी हात झटकून बाहेर आल्यावर त्याने फिर्यादीस ‘माझ्याशी लग्न कर, तू माझी नाही झाली तर कोणाची होऊ देणार नाही तसेच अॅसिड फेकेन,’ अशी धमकी दिली. या प्रकाराने घाबरून चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ५४४/२२) दिली असून, पोलिस उपनिरीक्षक चाळके तपास करीत आहेत.