पुणे,दि.२३:- कसबा पेठ पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे कसबा पेठ परिसरात भाजप व महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत होत आहे. दोन्ही पक्षाचे नेते बैठका घेण्याबरोबरच प्रचारातही सहभागी होत आहे. याचदरम्यान आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. भरारी पथक आणि वाहनांची तपासणीत आतापर्यंत 10 लाख 53 हजार 500 रुपये जप्त केले आहेत. अशी माहिती कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली.
कसबा पेठ मतदारसंघात 9 तपासणी नाके, 9 भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकांमार्फत संपूर्ण मतदारसंघात वाहनांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत 10 हजार पेक्षा जास्त वाहनांची तपासणी केली आहे. तसेच पथकामार्फत संपूर्ण प्रचार यंत्रणेचे व्हिडीओ शूटिंग करण्यात येत आहे. यासाठी पोलीस विभागामार्फत कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी सहकार्य मिळत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. पोटनिवडणुकीत भरारी पथकामार्फत व नाका तपासणीमध्ये 12 हजार 250 रुपये किंमतीची दारु जप्त करण्यात आली आहे
कसबा पेठ मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. मतदारसंघात सर्वच राजकीय नेत्यांच्या प्रचार सभा,
दुचाकी रॅली इत्यादीमुळे मतदारसंघात रणधुमाळी जोरात सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रत्येक उमेदवार व त्याचे कार्यकर्ते चढाओढीने प्रचार करताना दिसत आहेत.