पुणे,दि.१३:- चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत करणारा गुन्हेगार रणजीत रघुनाथ रामगुडे (20, सुतारवाडी, ) याच्यावर पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली असून त्यास कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात वर्षभराकरिता स्थानबध्द करण्यात आले आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह चतुःश्रृंगी व शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत धारदार हत्याराने खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयासह दंगा, बेकायदेशीररित्या हत्यार बाळगणे, दुखापत करणे आणि वाहनांची तोडफोड करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. याच्याविरूध्द ५ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. त्याच्यापासून धोका असल्याने नागरिक त्याच्याविरूध्द उघडपणे तक्रार करत नव्हते.त्यास स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण आणि पीसीबीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेखा वाघमारे यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे सादर केला होता. पोलिस आयुक्तांनी त्यास वर्षभरासाठी स्थानबध्द करून त्याची रवानगी कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात केली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त, यांनी दहशत निर्माण करणाया व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे.पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार स्विकारल्यानंतरची एम.पी. डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची ही ०९ वी कारवाई असुन, यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.