मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार
मुंबई, दि. १५- जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केली आहे.
अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
अपघातानंतर तातडीने मदतकार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि आयआरबी टीममधील तरुणांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, या संकटसमयी मदतकार्यात तातडीने धावून आल्याबद्दल या टीमच्या सदस्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.