पुणे,दि.१६:- पुणे शहरात अनधिकृत पथारी व्यावसायीकांवर कारवाई करणार्या पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या आज दि.१६ रोजी दुपारी १ च्या दरम्यान कैलास स्मशानभूमी रस्त्यावरील पथारी व्यावसायीकांवर कारवाई साठी गेलेल्या अधिकारी व कर्मचारी व सुरक्षा रक्षकांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज पुण्यात घडली आहे व कर्मचार्यांना पथारी व्यावसायीकांकडून सातत्याने मारहाणीचे प्रकार पुण्यात घडत आहेत. कारवाईसाठी मागणी करुनही पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून दिला जात नसल्याने अतिक्रमण निष्कासन करणे हे जीवावर बेतत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुणे महापालिकांच्या कामगार युनियनच्यावतीने उद्या पुणे महापालिका भवनच्या प्रांगणात सकाळी १० वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
पुण्यातील ढोले पाटील रोड क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत कैलास स्मशानभूमी रस्त्यावरील बेकायदा पथारी विक्रेत्यांवर कारवाईसाठी आज अतिक्रमण विभागाचे पथक गेले होते. कारवाई दरम्यान, हातगाडी व्यावसायीकांनी पथकातील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांला मारहाण केली आहे व्यावसायीक युवक आणि सुरक्षा रक्षकांदरम्यान साधारण दहा मिनिटे ही मारामारी सुरू होती. काहीवेळातच स्थानीक पोलिस आले. परंतू पोलिसांसमोरही व्यावसायीक अतिक्रमण विरोधी पथकातील सुरक्षा रक्षकांसोबत हातापायी करत होते. अखेर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तक्रारदार – प्रशांत कोळेकर यांच्या तक्रारीवरून आरोपी त्या ५ पथारी व्यावसायीक १) गणेश परदेशी २) रोहित परदेशी ३) सूरज परदेशी ४) महेश परदेशी ५) रोहन परदेशी यांच्या विरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहीती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख व उपआयुक्त माधव जगताप यांनी दिली.जगताप यांनी सांगितले, की मागील काही दिवसांत अतिक्रमण कारवाई करणार्या पथकांवर हल्ले होत आहेत. मागील महिन्यांत वारजे येथे झालेल्या हल्ल्यात एका कर्मचार्याच्या बोटाला आणि खांद्याला इजा झाली. याप्रकरणी वारजे पोलिसांनी चार जणांना अटक देखिल केली. तसेच औंध येथेही कारवाईला विरोध झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ईतक्रमण कारवाईसाठी वारंवार पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात येते. परंतू पोलिसांकडून बंदोबस्त मिळेलच याची खात्री नसते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागात २० पोलिस नियुक्तीवर आहेत. ही संख्या खूपच कमी असल्याने पुणे महापालिका आयुक्तांच्या मार्फतीने पोलिस आयुक्तांकडे सातत्याने बंदोबस्तासाठी मागणी करण्यात येते. यामध्ये पथविक्रेते, इमारतींच्या पार्किंग व साईड मार्जीनमधील बेकायदा व्यावसायीक असोत अथवा बेकायदा होर्डींग्जवरील कारवाई असो, पोलिसांची नितांत गरज असते. परंतू पोलिस बंदोबस्त उपलब्ध होत नसल्याने अशा गंभीर घटना घडतात.आजही कैलास स्मशानभूमी येथील कारवाई दरम्यान पोलिस बंदोबस्त उपलब्ध झाला नाही.यानंतरही स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्यावर अडथळा करणार्या बेकायदा व्यावसायीकांवर कारवाईसाठी अतिक्रमण विभागाचे पथक गेले होते. त्यांना पथारी व्यावसायीकांनी मारहाण केली.या अशा प्रसंगांमुळे कर्मचार्यांचे मनोबल खचत आहे.अतिक्रमण विरोधी पथकाला पोलिसांचे संरक्षण मिळावे यासह अन्य मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कामगार युनियनच्या वतीने उद्या (दि.१७) काम बंद ठेवून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती युनियनच्या पदाधिकार्यांनी दिली.