पुणे, दि.१८: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू असून संशयास्पद बँक व्यवहारांवर बँकांनी लक्ष ठेवावे आणि अशा सर्व व्यवहारांची माहिती जिल्हा प्रशासनाला तात्काळ द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा निवडणूक खर्च समन्वयक अधिकारी सोनाप्पा यमगर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रविण नलावडे यावेळी उपस्थित होते.
डॉ.दिवसे म्हणाले, निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार जिल्ह्यातील बँकाकडून होणाऱ्या व्यवहारांची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. एक लाख रुपयांपेक्षा जास्त रकमांच्या संशयास्पद व्यवहारांवर प्रशासन करडी नजर ठेवून आहे. बँकांनी त्यांच्या स्तरावर समन्वयक अधिकारी नियुक्त करुन जिल्हा अग्रणी बँक अधिकारी यांच्यामार्फत अशाप्रकारच्या संशयास्पद बँक व्यवहारांची माहिती जिल्हा प्रशासनाला तात्काळ उपलब्ध करुन द्यावी. आर्थिक व्यवहाराच्यादृष्टीने संवेदनशील असलेल्या काही भागात जिल्हा प्रशासनातर्फे विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, पतसंस्था, वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.