पुणे,दि.०१:- आज दि १ एप्रिल २०२४ पासून राज्यातील महावितरणच्या सर्व ग्राहकांचा स्थिर आकार वाढणार आहे. यात इंधन अधिभार जोडल्यास ग्राहकांवर सुमारे १० टक्के दरवाढीचा बोजा पडण्याचा अंदाज आहे. राज्य वीज नियामक आयोगाच्या मार्च २०२३ रोजीच्या आदेशानुसार ही दरवाढ होत आहे.
राज्य वीज नियामक आयोगाने मार्च- २०२३ मध्ये दोन वर्षांसाठी दोन टप्प्यात दरवाढ मंजूर केली होती. त्यानुसार १ एप्रिल २०२३ च्या तुलनेत १ एप्रिल २०२४ पासून सर्वच संवर्गातील ग्राहकांचा स्थिर आकार वाढेल. घरगुती संवर्गातील सिंगल फेससाठी पूर्वी ११६ रुपये लागायचे. आता १ एप्रिल २०२४ पासून १२८ रुपये लागतील. थ्री फेससाठी पूर्वीच्या ३८५ रुपयांऐवजी ४२५ रुपये लागतील.
वाणिज्यिक ग्राहकांना पूर्वीच्या ४७० रुपयांऐवजी ५१७ रुपये, सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या ग्राहकांना शून्य ते २० किलोवॉटसाठी पूर्वीच्या ११७ रुपयेएवजी १२९ रुपये, २० ते ४० किलोवॉटच्या ग्राहकाला १४२ रुपयेऐवजी १५६ रुपये, ४० किलोवॉटवरील ग्राहकाला पूर्वीच्या १७६ रुपयेएवजी १९४ रुपये स्थिर आकार लागेल. कृषी ग्राहकांना (मीटर नसलले) ५ हॉर्सपॉवरपर्यंत पूर्वीच्या ४६६ रुपयांऐवजी ५६३ रुपये, लघु औद्योगिक ग्राहकांना २० किलोवॉटपर्यंत ५३० रुपयांऐवजी ५८३ रुपये स्थिर आकार लागेल. पथदिव्यांसाठी पूर्वीच्या १२९ रुपयांऐवजी आता १४२ रुपये, सरकारी कार्यालये व रुग्णालयांना २० किलोवॉटपर्यंत पूर्वीच्या ३८८ रुपयांऐवजी आता ४२७ रुपये स्थिर आकार लागेल. या सर्व ग्राहकांना वेळोवेळी गरजेनुसार खुल्या बाजारातून घेतल्या जाणाऱ्या विजेच्या वाढीव खर्चानुसार इंधन अधिभार लागतो. गेल्यावर्षीइतकाच इंधन अधिभार पकडल्यास आणि त्यामध्ये वाढलेल्या स्थिर आकाराची रक्कम जोडल्यास ही एकत्रित वीज दरवाढ १ ९.२७ ते १०.२७ टक्के पर्यंत असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. या विषयावर महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी बोलण्यास नकार दिला. सोबतच वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसारच वीज दर निश्चित होत असल्याचेही स्पष्ट केले.
घरगुती ग्राहकांसाठी नवीन दर
वीज वापर युनिट. नवीन दर
००० ते १००. ५.५५
१०१ ते ३००. ११.४६
३०१ ते ५००. १५.७२
५०१ ते १०००. १७.८१