पुणे,दि.०२:- पुण्यातील नगर रोड येथील एका मध्यरात्री पर्यंत सुरू असलेल्या हॉटेलवर पोलिसांनी कारवाई केल्याने हॉटेल व्यावसायिकासह दोघांनी लोणीकंद पोलीस ठाण्यासमोर पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुण्यात घडली.
याप्रकरणी हॉटेल व्यावसायिक सत्यवान हौशीराम गावडे (वय ३४), राम अशोकराव गजमल (वय २२, दोघे रा. उबाळेनगर, वाघोली) यांच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलीस शिपाई अमोल गावडे यांनी याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावडे यांचे वाघोली परिसरात न्यू प्यासा हॉटेल आहे. हॉटेल मध्यरात्रीनंतर सुरू असल्याने पोलिसांनी हॉटेल कामगार राम गजमलविरुद्ध खटला दाखल केला. पोलिसांनी हॉटेलवर कारवाई केल्याने हॉटेल व्यावसायिक गावडे, कामगार गजमल लोणीकंद पोलीस ठाण्यात गेले.
दोघांनी सोमवारी सायंकाळी अंगावर ज्वलनशील द्रवपदार्थ ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोघांना रोखल्याने अनर्थ टळला. दोघांविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गावडे तपास करत आहेत.