पुणे, दि. २: कारागृह विभागाच्यावतीने ‘ई-प्रिझन्स’ प्रणालीअंतर्गत भारतीय तसेच विदेशी बंदी यांना कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘ई-मुलाखत’ सुविधेचा सुमारे २१ हजार ९६३ पुरूष व महिला बंद्यांनी लाभ घेतला आहे.
राज्यात १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीमध्ये तळोजा मध्यवर्ती कारागृहातील ३ हजार ४७८, ठाणे मध्यवर्ती कारागृह ३ हजार ४३८, नागपूर मध्यवर्ती कारागृह ३ हजार ४२५, मुंबई मध्यवर्ती कारागृह १ हजार ७९७, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह १ हजार ५५९, कल्याण जिल्हा कारागृह १ हजार ४४२, येरवडा मध्यवर्ती कारागृह १ हजार २२८ तसेच राज्यातील इतर कारागृहातील पुरूष व महिला बंद्यांनी ई-मुलाखत सुविधेचा लाभ घेतला आहे.
अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता यांच्या प्रयत्नामुळे सुरु करण्यात आलेल्या या सुविधेअंतर्गत राज्यातील कारागृहात बंद्यासंबंधीचे दैनंदिन कामकाज व बंद्यांना पुरविल्या जाणाऱ्या विविध सुविधांचे व्यवस्थापन करण्यात येते. या सुविधेची माहिती देण्याकरीता राज्यातील सर्व कारागृहांच्या दर्शनी भागात तसेच नातेवाईकांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात आलेले आहेत.
कुटुंबीय, नातेवाईक, वकील यांना बंद्यांसोबत मुलाखत घेण्याकरीता ‘ई-प्रिझन्स’ प्रणालीवर पूर्वनोंदणी करता येत असल्यामुळे नातेवाईकांना इच्छित दिवशी व वेळी बंद्यांची मुलाखत घेता येते. अधिकाधिक बंद्यांच्या नातेवाईकांचा या सुविधेचा लाभ घेण्याकडे कल असून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी येण्याच्या खर्चात बचत होणार आहे. ई-मुलाखतीस बंद्यांचे नातेवाईकांनी चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दहशतवादी कारवायामधील तसेच पाकिस्तानी बंदी यांना सुरक्षेच्या कारणास्तव या सुविधेचा लाभ नाकारण्यात आला आहे. राज्यातील कारागृहांमध्ये सुमारे ६०० पेक्षा अधिक विदेशी बंदी असून या सुविधेमुळे विदेशी बंद्यांना त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधता येत आहे.