पुणे,दि.२६ : – पुणे शहरातील शिवाजी नगर ते गणेशखिंड रोड येथे मेट्रोचे कामातील लोखंडी साहित्य चोरणाऱ्या चोरट्यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
सागर रमेश वैरागळ (वय २७) आणि रवी दिलीप अडागळे (वय २९, दोघे रा. इंदिरानगर, गुलटेकडी) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत एका तरुणाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरात शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी गणेशखिंड रस्त्यावरील हर्डीकर रुग्णालयासमोर लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. गुरुवारी (ता. २५) मध्यरात्री आरोपी सागर आणि रवी लोखंडी साहित्य चोरून नेत होते. तेथून निघालेल्या तरुणाने मेट्रोचे साहित्य चोरणाऱ्या दोघांना पाहिले. त्याने त्वरित या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना अटक केली.