येरवडा,दि.०७:- चार कैद्यांना हटकल्याच्या कारणावरून एका पोलीस हवालदाराला चार कैद्यांनी बेदम मारहाण केली.
ही घटना रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास येरवडा कारागृहाच्या नवीन गेट जवळ घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपूर्व संजय खंडागळे, सुरज नारायण आडागळे, आनंद उर्फ सोनू सिद्धेश्वर धड, नीरज लक्ष्मण ढवळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची कैद्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार नानासाहेब रामचंद्र मारणे (वय ५७) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नानासाहेब मारणे हे येरवडा कारागृहात नेमणुकीस आहेत. येरवडा कारागृहाच्या सी जे विभागात ते नेमणुकीस होते. या ठिकाणी नवीन यंत्रणा बसविण्यासाठी नवीन बांधकाम करण्यात येत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दगड पसरलेले आहेत. बांधकामातील दगड अंगावर पडण्याची शक्यता असल्यामुळे कोणालाही दुखापत होऊ नये म्हणून या ठिकाणी कैद्यांना येऊ देऊ नका असे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आलेले होते.
या ठिकाणी मारणे आपले कर्तव्य बजावत असताना आरोपी खंडागळे, अडागळे, धड, ढवळे हे त्या ठिकाणी जात होते. त्यांना या ठिकाणी जाऊ नका अशा सूचना मारणे यांनी केल्या आणि त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. मारणे यांच्या हातातील शासकीय लाठी हिसकावून घेतली आणि त्याने त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत.