पुणे,दि.२१:- पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर विशाल अग्रवाल फरार झाले होते. व पुणे पोलिसांनी त्यांच्या शोध सुरू केला होती. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटे छत्रपती संभाजीनगरमधून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतले. विशाल अग्रवाल यांना आज दुपारपर्यंत पुण्यात आणण्यात येईल. विशाल अग्रवाल यांच्यावर अटकेची कारवाई केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. यावेळी न्यायालय काय निकाल सुनावणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
विशाल अग्रवाल यांच्यावर नेमका काय गुन्हा?
वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन होता. त्याने पोर्शे कारने दोघांना चिरडल्यानंतर पुण्यात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता. यानंतर पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर मोटर वाहन अधिनियमाच्या कलम 3, 5 आणि 199 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे ठाऊक असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर बाल न्याय अधिनियमनाच्या कलम 75 आणि 77 अंतर्गत आखणी एक गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे विशाल अग्रवाल यांच्या अडचणी वाढल्या होत्या. यानंतर ते फरार झाले होते.