पुणे, दि. २१: पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलांना दारू पुरविल्याप्रकरणी पुणे शहरातील हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड (कोझी) व पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर (ओक वुड) मॅरियट सूट- ब्लॅक या दोन्ही हॉटेल व परमिट रूम तसेच पबचे आस्थापना विषयक व्यवहार जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ प्रभावासह बंद केले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने पुणे शहरातील सर्व पब्ससह इतर परमिट रूमची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. परवानाधारक हॉटेल, पबमध्ये अल्पवयीन मुलांना कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येवू नये. पहाटे १.३० नंतर कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येवू नये. नोकरनामधारक महिला वेटर्समार्फत रात्री ९.३० नंतर कोणतीही विदेशी दारू सर्व्ह करु नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
बॉम्बे प्रोहिबिशन कायदा १९४९ आणि बॉम्बे फॉरेन लिकर नियम १९५३ अंतर्गत येणाऱ्या विविध तरतुदी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर गुन्हे नोंदविण्यात येणार आहेत. संबंधित हॉटेल, पब आणि आस्थापनेला मद्य विक्रीबाबत देण्यात आलेले परवाने निलंबित अथवा रद्द करण्यात येईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांनी दिली आहे.