पुणे,दि.१२ :- झुंजार ऑनलाइन – पुणे शहरातील बाणेर परिसरातील धनकुडे वस्ती येथे एका तरुणाच्या खून केल्याची घटना दि.7 ते 9 तारखेच्या सुमारास घडली होती. ही घटना धनगुडे वस्ती येथे रविवारी (दि.9) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली होती. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने ठाणे येथील अंबरनाथ परिसरातून अटक केली आहे. अनैतिक संबंधातून आरोपीने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
नाना विठ्ठल चादर (वय-36 रा. वाकड गावठाण वाकड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कृष्णा भीमराव सुरोसे (वय-40 रा. बालेवाडी गावठाण मुळ रा. आनंदवाडी, ता. परतूर, जि. परभणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत नाना याचा भाऊ सचिन विठ्ठल चादर (वय-34 रा. वाकड गावठाण, वाकड) यांनी रविवारी (दि.9) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात आयपीसी 302 नुसार गुन्हा दाखल केला होता.
आरोपी कृष्णा आणि मयत नाना हे मित्र होते. कृष्णा अंबरनाथ परिसरात कुटुंबासोबत राहत होता. 2016 मध्ये तो बालेवाडी परिसरात राहण्यास आला होता. बालेवाडीत आल्यानंतर त्याची ओळख नाना चादर याच्यासोबत झाली. आरोपीच्या नात्यातील एका महिलेसोबत नाना चादर याचे अनैतिक संबंध होते. त्यामुळे आरोपी नाना याच्यावर चिडून होता.
कृष्णा आणि मयत नाना चादर यांना दारु पिण्याचे व्यसन होते. 7 जून रोजी रात्री चादर आणि त्याचा मित्र रामदास धनगुडे यांनी मोकळ्या जागेत दारु प्याली. दारुच्या नशेत नाना त्याच ठिकाणी झोपी गेला. धनगुडे तेथून निघून गेला. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी कृष्णा याला गांजा ओढण्याची तलफ झाली. त्यामुळे तो गांजा ओढण्यासाठी मोकळ्या जागेत आला. त्यावेळी त्याने नाना चादर झोपल्याचे पाहिले. चादर याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करुन कृष्णा तेथुन पसार झाला.
गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने तांत्रिक तपास करुन आरोपी कृष्णा सुरोशे याला अंबरनात परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नाना चादर याचे नात्यातील महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याने त्याचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे आरोपीने सांगितले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चार चे पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार वैभव मगदूम, हरीश मोरे, सारस साळवी, प्रवीण भालचिम, अजय गायकवाड, संजय आढारी, वैभव रणपिसे, नागेशसिंह कुंवर, एकनाथ जोशी यांच्या पथकाने केली.