पुणे,दि.२१ :- पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत सुमारे ४३६ कोटी ४४ लाख रुपयांचा गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तीन वर्षांपूर्वी अनिल भोसले यांच्यावर कारवाई केली होती. बँकेतील व्यवस्थापक, भोसले, मंगलदास बांदल यांच्यासह सात जणांविरुद्ध पोलिसांनी ६ सप्टेंबर २०२१ रोजी ८ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले.
कट करून कर्जदार आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. दरम्यान आता शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गेले तीन वर्षे कारागृहात असलेले माजी आमदार अनिल भोसले यांना उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे.
या गुन्ह्यामध्ये भोसले, बांदल, तसेच अन्य आरोपी कारागृहात होते. बांदल यांची काही महिन्यांपूर्वी जामिनावर मुक्तता झाली.
भोसले यांचा जामीन सत्र न्यायालयाने चार वेळा फेटाळला होता. त्याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
न्यायालयाने काही अटी शर्ती देऊन हा जामीन मंजूर केला आहे.