दर ९० सेकंदाला धावतेय बस, पिंपरी चिंचवड शहरातील पाच मुख्य कॉरिडॉरमध्ये दररोज ७ हजार ३८९ बसफेऱ्या सुरू
पिंपरी, ५ : -पिंपरी चिंचवड शहरामध्ये बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टम अर्थात बीआरटीएस ही उच्च क्षमतेची आणि चांगली वारंवारिता असणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून समोर येत आहे. या अंतर्गत शहरातील पाच मुख्य कॉरिडॉरमध्ये दररोज ७ हजार ३८९ बसफेऱ्या सुरू असून सुमारे ३ लाख ६० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. जलद आणि कार्यक्षम वाहतुकीसाठी खास डिझाइन करण्यात आलेल्या या वाहतूक व्यवस्थेमुळे सर्वात वेगवान बस सेवा मिळत असून गर्दीच्या वेळी काही मार्गांवर दर दीड ते दोन मिनिटांनी एक बस धावत आहे.
बीआरटीएस वाहतूक व्यवस्थेचा कणा म्हणून निगडी–दापोडी कॉरिडॉर ओळखला जातोय. या मार्गावर दररोज सुमारे १ लाख ५० हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. हा मार्ग पिंपरी चिंचवड महापालिका मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजीनगर, पुणे स्टेशन,स्वारगेट, हडपसर आणि कात्रज यांसारख्या प्रमुख ठिकाणांना जोडतोय. या मार्गावर सकाळी सहा ते आठ या दोन तासांच्या काळातच प्रत्येक तासाला किमान दोन ते तीन हजार प्रवासी प्रवास करतात.
तसेच दिघी – आळंदी आणि सांगवी – किवळे या दोन्ही मार्गांवर देखील गर्दीच्या वेळेस दर दोन ते अडीच मिनिटांनी एक बस धावते. तर, काळेवाडी–चिखली आणि नाशिक फाटा–वाकड या मार्गावर सध्या इतर मार्गांच्या तुलनेत कमी प्रवासी प्रवास करीत असले तरी येथेही दर पाच ते सहा मिनिटांनी एक बस धावते. या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचेही आयटीडीपी इंडिया संस्थेच्या सर्वेक्षणात समोर आले आहे.
१० किलोमीटर प्रवासासाठी लागतात २० मिनिटे
बीआरटीएस बस सरासरी प्रति तास ३० किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने धावते. हा वेग सामान्य वाहतुकीच्या तुलनेत दुप्पट आहे. या बसमध्ये प्रवास करताना दहा किमी अंतरासाठी फक्त वीस मिनिटे लागतात, जे सामान्य वाहतूक मार्गावर ५० मिनिटे लागतात. बसने प्रवास करताना बस प्रवाशांचा वेळ वाचत असल्यामुळेच ही सेवा लोकप्रिय ठरत आहे. ही सेवा अधिक गतीशील करण्यासाठी स्वतंत्र मार्गांशिवाय पीएमपीएमएलला अजून सुमारे २ हजार ७०० बसेसची कमतरता भासत आहे. त्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड मनपा पुणे महानगर विकास प्राधिकरण व बस सेवा देणारं महामंडळ हे प्रयत्नशील आहेत.
राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरणानुसार बीआरटीएसचा विकास
पिंपरी चिंचवडमधील बीआरटीएसचा विकास राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरण २००६ नुसार आहे, ज्यामध्ये प्रवाशांना प्राधान्य देण्यात आले आहे. २०१८ मधील पुणे मेट्रोपोलिटन रिजनच्या संपूर्ण वाहतूक आराखड्यातही, रस्ते रुंदीकरणाऐवजी बीआरटीएसचा विस्तार आणि बस सेवा वाढवण्याची शिफारस असून त्यानुसारच पिंपरी चिंचवड महापालिका काम करीत आहे.