पुणे दि. ०९ :- शासनाच्या विविध योजनांची जिल्हा परिषदेंच्या मार्फत गुणवत्तापूर्ण आणि यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून निर्धारित केलेला गुणवत्ता विकास कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या.
येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “गुणवत्ता विकास कार्यक्रम” या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त (अस्थापना) पी. बी. पाटील यांच्यासह विभागातील जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने विविध कल्याणकारी योजना आखण्यात येतात. या योजनांचा लाभ सामान्य जनतेला होण्यासाठी गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत शिक्षण, कौशल्य विकास कार्यक्रम व महिला बाल कल्याण विभागासाठी गुणवत्ता विकास कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यासाठी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रम मूल्यमापन समिती स्थापन करण्यात आली आहे. तर सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बाल विकास योजना समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच कौशल्य विकास कार्यक्रम समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीच्या माध्यमातून शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी गुणवत्ता विकास कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या समितीच्यावतीने करण्यात आलेल्या शिफारसींवर चर्चा करून त्यावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या शिफारशींची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गुणवत्ता विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते का? हे पाहण्यासाठी आपण स्वत: शाळांना आणि अंगणवाड्यांना अचानक भेटी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन सत्रात झालेल्या या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्राचे डॉ. कैलास शिंदे यांनी सादरीकरण केले. त्यावर चर्चासत्र घेण्यात आले. तसेच कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात महिला व बाल कल्याण, एकात्मिक बाल विकास योजना कार्यक्रमाचे अभिजीत राऊत यांनी सादरीकरण केले. त्यानंतर कौशल्य विकास कार्यक्रम समितीबाबत चर्चासत्र पार पडले.
या कार्यशाळेला पुणे विभागातील सर्व जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.