लोणीकंद दि,१७ :- पुणे पेरणेफाटा येथे असलेले आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी सुमारे २१ लाख ८६ हजार रुपये लुटल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. याबाबत लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरणेफाटा (ता. हवेली) येथे पुणे नगर हमरस्त्यालगत असलेले आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडल्याची खबर बँकेच्या अधिकाऱ्यांकडून समजल्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्याचे निरीक्षक डी. एस.हाके, सुरेशकुमार राऊत यांनी पोलीस पथक व बँकेच्या अधिकाऱ्यांसह काल सायंकाळी सातच्या सुमारास घटनास्थळी पाहणी केली. यावेळी एटीएम मशिनची एका बाजुची लोखंडी प्लेट गॅस कटरच्या सहायाने कापून एटीएम मशीन उघडल्याचे व त्यातून २१ लाख ८६ हजार रुपये लुटल्याचे निदर्शनास आले. आहे रस्त्यावर असले तरी दोन्ही बाजूने वर्दळीचे ठिकाण असूनही चोरी झाली.
काल दुपारी एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कॅश व्हॅन पथकाला शटर अर्धवट बंद दिसल्याने पथकाने ही घटना बँकेला कळवली. दरम्यान बँकेचे अधिकारी व लोणीकंद पोलीस काल सायंकाळी आल्यानंतर ही चोरी झालेली सर्वांना समजली. दरम्यान काल सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.आहे