पुणे दि २१ :-;पुणे शहरातील सर्व मॉल, मल्टिप्लेक्स चालकांना टु -व्हिलर आणि फोर व्हिलर पार्किंगसाठी बेकायदेशीर शुल्क नागरिकांकडून आकारणी घेण्याचा कोणताही अधिकार नाही. यामुळे बेकायदेशीरपणे पार्किंगच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे उकळल्यास संबंधित मॉल, मल्टिप्लेक्स चालकांची पुणे महानगरपालिकेला तक्रार केल्यास त्या मॉल, मल्टिप्लेक्स चालकावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येतील अशी स्पष्ट भूमिका महापालिकेच्या शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी येथे घेतली. दरम्यान पार्किंगसाठी पैसे घेणाऱ्या मॉलवर नागरिकांनी देखील बहिष्कार टाकावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.
महापालिकेच्या शहर सुधारण समितीच्या बैठकीत शहरामधील मॉल, मल्टिप्लेक्स नागरिकांना पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणात आकरण्यात येत असलेल्या पार्किंग शुल्काबाबत सर्वच सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर समितीच्या बैठकीत शहरातील सर्व मॉल, मल्टिप्लेक्सने नागरिकांसाठी मोफत पार्किंग सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असा ठराव करण्यात आला. तसेच पार्किंग शुल्क घेणा-या मॉलला नोटीसा देण्याचे आदेश देखील समितीने महापालिका प्रशासनाल दिले होते. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने पार्किंग शुल्क घेणा-या मॉल, मल्टिप्लेक्सला नोटीसा देण्यास सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर अमोल बालवडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मॉल, मल्टिप्लेक्सकडून आकारण्यात येणा-या पार्किंग शुल्काबाबत महापालिकेची भूमिका स्पष्ट केली.अमोल बालवडकर यांनी सांगितले की, शहरातील मॉलला कोणत्याही कायद्यानुसार पार्किंग शुल्क घेण्याचा अधिकार नाही. परंतु अधिकार नसताना नागरिकांकडून पार्किंग शुल्क घेऊन लुट केली जाते. याबाबत आता महापालिकेने कडक धोरण अवलंबिण्याच निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील मॉल असे पार्किंग शुल्क घेत असतील नागरिकांनी याबाबत महापालिकेकडे तक्रार करण्याचे आवाहन बालवडक यांनी केले. तसेच अधिकार नसताना नागरिकांकडून पैसे घेणा-या मॉलच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय देखील झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान महापालिका मॉल, मल्टिप्लेक्सवर कारवाई करणारच आहे. परंतु नागरिकांनी देखील अशा मॉलवर बहिष्कार टाकल्यास त्याचा चांगला परिणाम होईल, असे बालवडकर यांनी सांगितले.