मुंबई, दि.२९ : पावसामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पुण्यातील कोंढवा येथे झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख आणि जखमींना 25 हजार रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली आहे.
या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांनी मृतांना कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, बांधकाम मजूर रहात असलेल्या कच्च्या झोपडीवर रात्री दीडच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो.