मुंबई, दि. १७ :- मंत्री, आमदारांप्रमाणेच थेट जनतेतून निवडून आलेले सरपंचही आता पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामपंचायतीबाबत असलेली बांधिलकी आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने असलेली जबाबदारी याबाबत गावातील जनतेमध्ये तसेच लोकप्रतिनिधींमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या शपथ घेण्यामागचा उद्देश असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा केल्यानंतर ग्रामविकास विभागाने यासंदर्भात जो प्रस्ताव सादर केला होता, त्यास मान्यता देण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
असा आहे प्रस्ताव-सरपंच व सदस्यांना शपथ देण्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिवांनी नुकत्याच दिल्या आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ३३(२) अन्वये जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेला अधिकारी पहिल्या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारेल, पहिल्या सभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी अध्यासी अधिकारी थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच यांना शपथ देईल आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ चा अवलंब करून कार्यवाही सुरू करेल. अध्यासी अधिकाऱ्यांनी गण संख्येसंबंधी कार्यवाही पूर्ण केल्यानंतर सरपंच हे पहिल्या सभेचे अध्यासी अधिकारी म्हणून काम पाहतील. अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच ग्रामपंचायतीमधील नवनियुक्त इतर सदस्यांना सामुदायिक शपथ देतील व त्यानंतर उपसरपंचांची निवडणूक पार पाडली जाणार आहे, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणूकीनंतर हा प्रस्ताव लागू होणार आहे. जि. प. अध्यक्षांनाही शपथ देण्याचा विचार सरपंचांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सदस्य तसेच पंचायत समितीच्या सभापती आणि सदस्य यांनादेखील शपथ देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
बाळू राऊत प्रतिनिधी