मुंबई दि,२२ : – वाकोला पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, तीन अल्पवयीन तरुणांसह चौघांना अटक केली आहे, तर गुन्हे शाखेच्या युनिट आठच्या पथकाने दोन अल्पवयीन चोरांना पकडले. या दोन्ही टोळ्यांकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. वाकोला पोलिस वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सागर निकम, कॉन्स्टेबल तर्फे, काटकर यांच्या पथकाने दुचाकी चोरणाऱ्या इम्तियाज मलिक आणि त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना वाकोला परिसरातून अटक केली. त्यांच्याकडे चोरीच्या पाच दुचाकी सापडल्या. वाकोला, खार, टिळकनगर, ठाणे या परिसरातून या दुचाकी चोरण्यात आल्या होत्या. या टोळीने मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी दुचाकी चोरी केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दुसऱ्या कारवाईत पोलिस निरीक्षक अरुण पोखरकर यांच्या पथकाने मालवणी परिसरात सापळा रचून दोघांना अटक केली. हे दोघे चोरीच्या दुचाकी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या दोघांकडून पोलिसांनी दोन दुचाकी जप्त केल्या.
बाळू राऊत प्रतिनिधी