.बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) नुकतेच झालेल्या राज्यस्तरीय पुर्व माध्यामिक शिष्यवृत्ती परीक्षेत रायगड जिल्हा परिषदेच्या आमडोशी शाळेतील विद्यार्थी कुमार सोहम सुनील शिगवण या विद्यार्थ्यांने सुयश संपादन केल्या बद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे. कुमार सोहम शिगवण हा माणगांव तालुक्यातील आमडोशी गावातील एका गरीब शेतकरी कुटुंबातील हुशार,प्रामाणिक, गुणवंत आणि आज्ञाधारक विद्यार्थी आहे. त्याचे आई वडील शेती व्यवसाय करतात. सोहमने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अहोरात्र अभ्यास करून शिष्यवृत्ती परीक्षेत संपूर्ण माणगांव तालुक्यातील विद्यार्थ्यां मधून अकरावा क्रमांक पटकावून आमडोशी शाळेच्या गुणवत्तेची परंपरा कायम अबाधित ठेवली आहे. त्याच्या या यशामुळे निश्चितच आमडोशी शाळेच्या सुलौकीकात भर पडली आहे. आमडोशी शाळेतील विद्यार्थ्यांनी या आधी सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश संपादन केले आहे. कुमार सोहम याने पूर्व माध्यामिक शिष्यवृत्ती परीक्षेत संपादन केलेल्या उत्तुंग यशामुळे रायगड जिल्हा परिषद शाळा आमडोशीचे विद्यार्थी, सोहमचे आई बाबा, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोहमने मिळवलेल्या यशामुळे बद्दल माणगांव पंचायत समिती सदस्य श्री. शैलेश दादा भोनकर तसेच त्याचे वर्ग शिक्षक श्री. प्रकाश उभारे, मुख्याध्यापक श्री. मनोहर काप, शिक्षिका सौ. श्रुतिका पाटील, श्री. प्रकाश बक्कम, श्री. आनंद दळवी इत्यादींनी सोहमचे कौतुक करुन मनःपूर्वक अभिनंदन केले.