.पंढरपूर दि३० :- (प्रतिनिधी):- आजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या आणि स्पर्धेच्या काळात रोगमुक्त रहाण्यासाठी योग साधना हाच योग्य मार्ग आहे. असे प्रतिपादन पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांनी केले. पंढरपूरमध्ये लिंक रोड वरील शिवयोगी मंगल भवन येथे श्रीअंबिका योग कुटीर, ठाणे या संस्थेच्या वैराग शाखेच्या वतीने मोफत त्रैमासिक योग अभ्यास वर्गाचे उद्घाटन झाले. यावेळी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ‘‘येथे सुरु झालेला त्रैमासिक मोफत योग अभ्यास वर्ग ही पंढरपूरकरांसाठी खुप मोठी पर्वणी आहे. येथील योग वर्गात तंत्रशुध्द योग शिक्षण घेऊन व्याधीमुक्त व्हावे. येथे महिलांसाठी स्वतंत्र योग प्रशिक्षणाची सोय उपलब्ध केली याचा खुप आनंद झाला. महिला भगिणींनी विनाऔषध व्याधीमुक्त होण्यासाठी व निरोगी शरीर प्राप्त होणेसाठी याचा लाभ घ्यावा. यावेळी पोलीस निरीक्षक नाना कदम व दिगंबर बरडे गुरुजी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या योग प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी श्री अंबिका योग कुटीर ठाणे चे साधक व वैराग शाखेचे संचालक दिगंबर बरडे गुरुजी, मर्चंट बँकेचे चेअरमन नागेशकाका भोसले, श्रीअंबिका योगचे साधक व पोलिस निरीक्षक नाना कदम, समाजसेवक ओंकार बसवंती, सौ.आरतीताई बसवंती, पत्रकार भगवान वानखेडे, श्री अंबिका योग कुटीर शाका वैराग चे संचालक सोपल सर, प्रशिक्षक डॉ. साळवे व डॉ.सौ.साळवे, नरगिडे सर, बोधले सर, भालेराव सर, भडोळे सर, देशमुख सर, उंडाळे सर, सौ.बरडे, सौ.सोपल आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विश्वनाथ धावणे यांनी केले तर आभार बोधले सर यांनी मानले.श्री अंबिका योग कुटीर ठाणे ही एक जगप्रसिद्ध योग संस्था आहे . सदर योग संस्था योगाचार्य श्री निकम गुरूजी यांनी स्थापन केली असुन ते सेवानिवृत्त होईपर्यंत पोलिस शिपाई म्हणुन कार्यरत होते. शरीरशुध्दी नंतर योगाभ्यास असा अभ्यासक्रम त्यांनी तयार केला आहे . आपल्या हयातीत त्यांनी हा योग मोफत शिकवून अनेक लोकांना स्वस्थ बनविले आहे. त्याचेच योग प्रशिक्षण येथे दिले जाते. फक्त दर रविवारी दोन तास असा तीन महिन्याचा हा अभ्यास आहे. तरी जास्तीत जास्त पंढरपूरकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने केले आहे.