.पुणे दि १५ :- भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त परिसरात वैद्यकीय सेवा व अन्य मदत उपलब्ध करून दिली आहे. पूरपश्चात संसर्गजन्य विकारांचा प्रसार टाळण्यासाठी स्वच्छता, तपासणी आणि उपचार सुरू असल्याचे विद्यापीठाचे आधारस्तंभ आमदार विश्वजीत कदम यांनी सांगितले.
सांगली येथील विद्यापीठाच्या वैद्यकीय व दंतवैद्यक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह एक हजार जणांच्या पथकाने सलग एक आठवडा पूरग्रस्त भागात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या. पथकाच्या वतीने ठिकठिकाणी वैद्यकीय मदत केंद्र सुरू करण्यात आली. दुर्गम भागापर्यंत पोहोचून औषधे आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ आर बी कुलकर्णी व उप अधिष्ठाता डॉ गिरीश धुमाळे यांनी दिली. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या अंकलखोप, नांद्रे, कर्नाल या भागात जाणे शक्य नसताना स्थानिक आमदार मोहन कदम यांनी उपलब्ध करून दिलेल्या ट्रॅक्टरद्वारे पथकाने सेवाकार्य केले.
शरीरशास्त्र विभागप्रमुख डॉ नितीन मुदीराज, फिजिओथेरपी विभागप्रमुख डॉ सचिन सेठी व डॉ स्वप्निल मेहता यांनी पथकाला मार्गदर्शन केले.
डॉ मुकेश केणे, डॉ अजय झोरे, डॉ अखिलेश श्रीप्रकाश पांडे, डॉ ॐकार कदम, डॉ सर्वजीत पाटील, डॉ प्रतीक गोडसे व डॉ रामेश्वर शिंदे यांनी अंकलखोप येथे या उपक्रमात विशेष परिश्रम घेतले.