पुणे दि. १६: -पूरग्रस्त कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूराची स्थिती निवळली असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. प्रशासनाच्यावतीने स्वच्छता, आरोग्य, मदत व पुनर्वसनाचे काम वेगाने सुरू असून पुणे विभागातील 33 हजार 775 पुरग्रस्त कुटुंबांना सानुग्रह अनुदानापोटी 16 कोटी 88 लाख 75 हजार रुपयांच्या रोख रकमेचे वाटप करण्यात आले आहे. पूरबाधित क्षेत्रातील पडझड झालेल्या घरांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून विभागात एकूण 1 हजार 169 घरांची पूर्णत: तर 18 हजार 533 घरांची अंशत: अशी मिळून 19 हजार 702 घरांची तर 526 गोठ्यांची पडझड झाली असून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी कमी झाली असून त्या धोकापातळीच्या खाली वाहत आहेत. या पूरामुळे सांगली जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 104 गावे बाधीत असून यामधील 64 हजार 646 कुटुंबातील 3 लाख 5 हजार 957 व्यक्ती स्थानांतरील असून त्यांची 64 तात्पुरत्या निवारा शिबीरात व्यवस्था करण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 369 गावे बाधीत असून 4 लाख 7 हजार 134 लोकांना स्थानांतरीत करून त्यांची 181 तात्पुरत्या निवारा शिबीरात व्यवस्था करण्यात आली आहे. पूरामुळे संपर्क तुटलेल्या सांगली जिल्ह्यातील सर्व गावांचा संपर्क पुर्ववत झाला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील केवळ पाच गावे अजूनही पुराच्या पाण्याने वेढली असून यामधील 20 हजार 541 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
पुरामुळे विभागातील एकूण 54 लोकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 26, कोल्हापूर जिल्ह्यातील 10, सातारा जिल्ह्यातील 8, पुणे जिल्ह्यातील 9 तर सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. विभागातील चार लोक बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे. पुराच्या तडाख्यात गाय व म्हैसवर्गीय 7 हजार 847 जनावरे, 1 हजार 65 शेळ्या-मेंढ्या तर 166 लहान वासरे व गाढवांचा मृत्यू अथवा बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सांगली जिल्ह्यात 8 बचाव पथके तैनात असून त्यामध्ये 20 बोटी व 176 जवानांचा समावेश आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात 7 बचावपथके तैनात असून 19 बोटी व 147 जवानांचा समावेश आहे.
विविध संस्था व व्यक्तींकडून विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधी करिता 6 लाख 46 हजार 111 रुपयांचे धनादेश जमा झाले आहेत. या व्यतिरिक्त वस्तूरूपातील मदतीचाही समावेश आहे. आजपर्यंत सांगली जिल्ह्यासाठी 44 ट्रक तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी 42 ट्रक असे एकूण 86 ट्रकव्दारे मदतीचे साहित्य पाठविण्यात आले आहे.
पूरामुळे खंडीत झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणाच्या माध्यमातून युध्द पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. महावितरणच्या पुणे, बारामती परिमंडळातून 48 पथके कोल्हापूर येथे तर 12 पथके सांगली जिल्ह्यात पाठविण्यात आली असून त्यांचे काम सुरू आहे. या पथकांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील 13 उपकेंद्र, 2 हजार 527 रोहित्र दुरूस्त करण्यात आले असून एकूण 1 लाख 27 हजार ग्राहकांचा विद्युत पुरवठा पुर्ववत करण्यात आला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील 24 उपकेंद्रे, 3 हजार 288 रोहित्रे दुरूस्त करण्यात आली असून 1 लाख 70 हजार 133 ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरूळीत करण्यात महावितरणला यश आले आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणारे पुरेशा साहित्याची उपलब्धता करण्यात आली आहे.
पूरबाधित क्षेत्रातील बँकींग सेवा पूर्ववत करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले असून सांगली जिल्ह्यातील 329 एटीएम पैकी 229 एटीएम मशिन दुरूस्त करण्यात आले आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील 647 एटीएम पैकी 390 एटीएम मशिन दुरूस्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील 47 बंद रस्त्यांपैकी 37 रस्ते वाहतुकीसाठी सुरू करण्यात आले आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील 88 बंद रस्त्यांपैकी 65 रस्ते वाहतुकीसाठी सुरु करण्यात आले आहेत. तसेच पूरस्थितीमध्ये बंद झालेल्या 45 मार्गापैकी 39 मार्गावरील एसटीची वाहतुक पुर्ववत सुरु करण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील बंद असलेल्या 31 मार्गापैकी 26 मार्गावरील एसटीची वाहतुक सुरु करण्यात आली आहे.
शासननिर्णयानुसार ग्रामीण भागातील बाधित कुटुंबांना 10 हजार तर शहरी कुटुंबांना 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. यापैकी 5 हजार रुपये रोख स्वरुपात बाधित कुटुंबाला वाटण्याचे काम सुरु असून उर्वरीत रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. आतापर्यंत पुणे विभागात 33 हजार 775 बाधित कुटुंबांना 16 कोटी 88 लाख 75 हजार रुपयांची रोख रक्कमेचे वाटप करण्यात आले आहेत. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 9 कोटी 1 लाख 80 हजार रुपये, सांगली जिल्ह्यात 7 कोटी 21 लाख 25 हजार, सातारा जिल्ह्यात 28 लाख 30 हजार, पुणे जिल्ह्यात 17 लाख 50 हजार तर सोलापूर जिल्ह्यात 19 लाख 90 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्याच बरोबर पुणे विभागातील 23 हजार 889 कुटुंबांना गहू व तांदुळ प्रत्येकी 2388.9 क्विंटल तर 10 हजार 251 लिटर केरोसिनचे वाटप करण्यात आल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे.