पुणे,दि २७ :- महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत प्रज्वला योजने अंतर्गत महिला बचत गटातील महिलांकरिता एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन बुधवार दि. २८/८/२०१९ रोजी दुपारी १ ते ४ या वेळात गणेश कला क्रिडा मंच, स्वारगेट येथे आयोजित करण्यात आले आहे.
राज्यभरातील महिला बचत गटांची आर्थिक, सामाजिक आणि कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून प्रज्वला योजना राबविण्यात येत आहे. प्रज्वला योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात बचत गटातील महिलांना प्रशिक्षण द्यावयाचे असून, दुस-या टप्प्यात एक जिल्हा, एक वस्तू असे क्लस्टर्स तयार करण्यात येणार आहेत. त्यातून प्रत्येक जिल्ह्याला एक ओळख आणि महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. महिला बचत गटांनी क्लस्टर्सच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रज्वला योजनेच्या तिसèया टप्प्यात बचतगट बाजार जिल्ह्याच्या ठिकाणी उभारण्यात येतील.
प्रशिक्षण कार्यशाळेत बचतगटातील महिलांकरिता कायदेविषयक, सामाजिक, आर्थिक ज्ञानाबाबत माहिती दिली जाणार आहे. प्रशिक्षण कार्यशाळेकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. विजयाताई रहाटकर, मा. महापौर सौ. मुक्ता शैलेश टिळक तसेच महिला बालकल्याण समिती अध्यक्षा, सर्व सदस्य तसेच मा. खासदार, मा. आमदार उपस्थित रहाणार आहेत.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मार्गदर्शनानुसार पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने प्रशिक्षण कार्यशाळेचे नियोजन करण्यात येत असल्याचे समाज विकास विभागाचे उपायुक्त सुनिल इंदलकर यांनी कळविले आहे.