पुणे, दि. ०१ :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या विचार व साहित्यातून वंचितांचा आवाज मांडला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मातंग समाजाच्या उत्थान आणि विकासासाठी शासन सर्वतोपरी योगदान देईल. पुणे येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने उदयान उभारण्यात येणार असल्याचे वित्त् व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले.महाराष्ट्र राज्य मातंग समाज संघटनेच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले भवन, वानवडी येथे करण्यात आले होते. त्यावेळी श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी माजी मंत्री दिलीप कांबळे, नगरसेवक सुनिल कांबळे, जेष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर, भीमराव पाटोळे, राजेंद्र कोंडरे आदी उपस्थित होते. श्री. मुनगंटीवार म्हणाले, अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचे विचार, साहित्य समाजातील शेवटच्या घटकांपर्यत पोहोचावे यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. अण्णा भाऊंच्या विचाराचे समाजातील प्रत्येकाने अनुकरण करणे आवश्यक आहे. आज समाजातील उत्तम कार्य करणारांचा गौरव करण्याची संधी मिळाली याचा आनंद मोठा आहे. गौरव झालेल्या व्यक्तींना नक्कीच शक्ती मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी कायम श्रमिकांचा सन्मान केला आहे. त्यांचे विचार प्रत्येकाला चैतन्य, नवचैतन्य देतात, जन्मशताब्दी वर्षात 100 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला असून मातंग समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगून पुणे येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने उदयान उभे करण्यात येणार आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. वंचितांसाठी लढणाऱ्या अण्णांचे टपाल तिकीट केंद्र सरकारने केवळ आठच दिवसात मंजूर केले. वंचितांच्या विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्नशिल राहणार असल्याचेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी अण्णा भाऊंच्या नावाने पुरस्कार देवून गत दहा वर्षापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींचा गौरव करण्यात येत असल्याचे सांगितले.या यावेळीन्यवरांच्या हस्ते जेष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर, भीमराव पाटोळे, राजेंद्र कोंडरे यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देत गौरव करण्यात आला. यावेळी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.