मुंबई : ढोल तश्याच्या गजरात गणेशाचे आगमन मोठ्या थाटात झाले. गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपति म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे. संपूर्ण जगभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. विद्येची आणि बुद्धीची देवता विघ्नहर्ता सर्वाच्या दुःखाचे निवारण करत असतो.
गणपतीच्या आख्यायिका
पार्वतीने एकदिवशी नंदीला दरवाज्यात उभा करून आंघोळ करण्यास निघून गेली. यावेळी शंकर तेथे आले. त्यांनी नंदीस झुगारून न्हाणीघरात प्रवेश केला. यामुळे पार्वती अपमानित व रागाने क्षुब्ध झाली.शेवटी सखी जया व विजया यांच्या सल्ल्याने चिखलापासून एका सुंदर पुत्राची मूर्ती निर्मिली व त्यात प्राण फुंकले. या पुत्रास तिने स्वतःचा अनुचर म्हणून नेमले. नंतर एकेदिवशी या कुमार मुलास दारी नेमून पार्वती स्नानास गेली असता शंकर तेथे उपस्थित झाले. कुमाराने शंकरास अडवले. पहिल्यांदा कुमारासोबत त्यांचा वाद व नंतर पार्वतीच्या मनातील इंगिताप्रमाणे युद्ध झाले. शिव व सकल देवतागण या लढाईत पराजित झाले. तेव्हा नारदाच्या सल्ल्याने विष्णूद्वारे कुमारास मोहित करून शंकरांनी त्याचे मुंडके उडवले. ही वार्ता ऐकून पार्वतीने क्रुद्ध होऊन सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला. नारद व देवगणांनी तिज शांत केले. तेव्हा पार्वतीने तिच्या पुत्राच्या पुनर्जीवनाची मागणी केली व तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा अशी इच्छा व्यक्तिली. शंकरांनी होकार भरला. परंतु कुमाराचे मस्तक कोठेही न मिळाल्याने त्यांनी गणांस उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा केली. गण एका हत्तीचे मस्तक घेऊन उपस्थित झाले. देवगणांनी ह्या मुंडक्याच्या साहाय्याने कुमारास जिवंत केले. तदपरांत शंकरांनी या मुलास स्वपुत्र म्हणून स्वीकारले. देवगणांच्या आशिर्वादाने हा मुलगा पूज्य झाला व गणेश नावाने प्रसिद्ध झाला.
*गणपतीची विविध नावे* गणपतीची बारा नावे १.वक्रतुंड २. एकदंत ३.कृष्णपिंगाक्ष ४. गजवक्त्र ५.लंबोदर ६.विकट ७.विघ्नराजेंद्र ८.धूम्रवर्ण ९.भालचंद १०.विनायक ११.गणपती १२.गजानन
अन्य नावे/ नामांतरे
ब्रह्मणस्पती, मयुरेश्वर, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, विघ्नहर, शूर्पकर्ण
गणपतीचे वाहन : उंदीर, शस्त्र : पाश, अंकुश, परशु, दंत
वडील : शंकर, आई : पार्वती
पत्नी :ऋद्धी, सिद्धी
मंत्र : ॐ गं गणपतये नमः
एक नजर अष्टविनायक गणपती विषयी
रांजणगावचा महागणपती
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रांजणगाव हे एक लहानसे गाव पुणे नगर रोडवर लागते . रस्त्यापासून जवळच गणेशाचे मंदिर आहे . मंदिराचे दगडी पोत आणि आसपासच्या ओवऱ्या यांची बरीच पडझड झालेली आहे . हल्लीच्या देवस्थान कमिटीने या गोष्टीकडे लक्ष घालून जीर्णेद्धार करावयाचे काम हाती घेतले आहे . प्राचीन काळी त्रिपुरासूराला ठार मारण्याची शंकराला प्रेरणा देणारा हा श्री गणपती होय . या मंदिराचा दरवाजा पूर्वेकडे आहे . देवळाचा मुख्य गाभारा आणि मंडप अजूनही चांगल्या स्थितीत आहे . मराठे शाहीतील अनेक सरदारांनी या देवळाला इनामे दिली होती . या मंदिरातील दोनही गाभारे थोरले माधवराव पेशवे यांनी बांधल्याची नोंद आहे . हा गणपती उजव्या सोंडेचा आहे . असे सांगितले जाते . की , अगदी प्राचीन काळी मूर्ती खाली तळघरात आहे . तिला दहा तोंडे आणि वीस हात आहेत . छत्रपती शाहू महाराजांनी या मंदिराला व्यवस्थेसाठी पहिली सनद दिली आणि थोरले माधवराव पेशवे यांनी हा गाव व्यवस्थेसाठी इनाम दिला . येथे फक्त एस . टी . नेच जाता येते . रेल्वेने नाही . या शिवाय इतरही गणेशस्थाने महाराष्ट्रात आहेत . प्राचीन कालापासून या स्थानांचे महात्म्य सांगितले आहे .
पालीचा बल्लाळेश्वर
रायगड जिल्हयात सुधागड तालुक्यात पाली हे गाव आहे . अगदी देवळाच्या जवळच सरसगड आहे . बाल बल्लाळाला प्रत्यक्ष दर्शन देणारा विनायक म्हणून बल्लाळेश्वर किंवा बल्लाळ विनायक होय . चिमाजी अप्पा पेशवे यांनी येथील मंदिराला एक मोठी घंटा दिली आहे व येथील मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला . सध्याच्या या मंदिराचा गाभारा पंधरा फूट उंच आहे . उंदराची मूर्ती हातात मोदक घेऊन उभी आहे . सभामंडप चाळीस फूट लांब आहे . देवळासमोर दोन उत्तम प्रकारे बांधलेली तळी आहेत . पण या तळ्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तळी पाण्याने भरलेली असूनसुद्धा त्यांचा फारसा उपसा होत नाही व वापरही होत नाही . विनायकाची मूर्ती तीन फूट उंच आहे . सिंहासन दगडी आहे . विनायकाच्या डोळ्यात व बेंबीत खरे हिरे आहेत . विनायकावर ऋद्धिसिद्धीच्या मूर्ती चौऱ्या ढाळीत आहेत . सभामंडपात दोन मोठाले हत्ती आहेत . माघ महिन्यात येथे मोठा उत्सव होतो . येथे एस . टी . नेच जाता येते .
महाडचा वरद विनायक
रायगड जिल्ह्यात खालापूर तालूक्यात झाडीत उंचावर बसलेले लहानसे महड गाव आहे . या गावी गणपतीमुळे गृत्समदचा गृत्समदचा गणनांत्वा हा गणपतीचा मंत्र सुचला . त्यात गृत्समद मुनीने येथे सर्व प्रथम गणपतीचे मंदिर बांधले होते . त्यानंतर स्थित्यंतरे होत होत प्राचीन काळापासून आजपर्यंत काळाच्या ओघात अस्तित्व टिकून असलेले हे मंदिर भोवतालच्या झाडीमुळे जरा वेगळे आणि निसर्गाला जवळ असलेले वाटते . मंदिराच्या मागील बाजूस एक मोठे तळे आहे . ते पाण्याने भरलेले असते . तेथे असंख्य कमळे फुललेली असतात . पण तळयाकडेसुद्धा मंदिर चालक किंवा गावकरी लक्ष देत नसल्याने हे उत्तम तळे तसे उपेक्षितच राहिले आहे . येथील गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची आहे . सिंहासन दगडी आहे . सभामंडप दोन असून आतील सभामंडप आठ फूट लांबी – रुंदीचा चौरस आहे आणि बाहेरचा सभामंडप चाळीस फूट लांब – रूंद आहे . या भागात पाऊस भरपूर पडत असल्याने या मंदिराची वास्तू लांबून एखाद्या कौलारू घऱासारखी दिसते . हल्लीची मूर्ती मंदिरामागील तळ्यात 1690 साली पौडकर नावाच्या गुरवाला सापडली . ती तेथे पेशव्यांचे सरदार बिवलकर यांनी मंदिराच्या स्वरूपात स्थापन केली आणि मंदिर संपूर्णपणे पुन्हा बांधले . 1892 सालापासून या देवळातील नंदादीप अखंडपणे तेवत आहे . येथे फक्त एस . टी नेच जाता येते . रेल्वेची सोय नाही .
ओझरचा विघ्नहर
पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात ओझर नावाचे गाव आहे . येथील गणपतीला विघ्नहर असे म्हणतात . हे मंदिर अती प्राचीन आहे . काळाच्या ओघात स्थित्यंतरे होत होत आज असलेल्या अवस्थेत दिसते . येथील गणपतीची स्थापना भाद्रपद शुद्ध चतुर्थीला प्राचीन देवांनी केली असे म्हणतात . हे मंदिर गावात असून देवळाचे तोंड पूर्वेकडे आहे . येथील गणपती डाव्या सोंडेचा आहे . गणपतीच्या डोळ्यात दोन तेजस्वी रत्ने आहेत आणि कपाळावर हिरा बसविलेला आहे . त्यामुळे गणपतीचे तेज अधिकच झळकते . गणपतीच्या दोन्ही बाजूला पितळीच्या ऋद्धिसिद्धीच्या मूर्ती आहेत . सभामंडप आठ बाय दहा फूट मापाचा आहे . दरवाजापाशी असलेला काळा उंदीर जणू पळतो आहे असे वाटते . देवळात दोन दिपमाळा आहेत . त्रिपुरी पौर्णिमेपासून काही दिवस त्या पाजळत असतात . वसई जिंकून परत येत असताना चिमाजी अप्पांनी या गणेशाचे दर्शन घेतले आणि येथील मंदिराचा जीर्णोद्धार केला होता .
थेऊरचा चिंतामणी
पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात थेऊर हे गाव आहे . तेथील गणपती चिंतामणी म्हणून ओळखला जातो . दुष्ट इंद्राला गौतम मुनींच्या शापामुळे जी हजार छिद्रे अंगावर निर्माण झाली होती त्या छिद्राचे हजार डोळ्यांत रुपांतर येथील गणपतीने इंद्रावर केलेल्या कृपेमुळे झाले होते . इतक्या प्राचीन काळापासून हे गणेशस्थान प्रसिद्ध आहे . देवळादेवळाचा मुख्य दरवाजा उत्तरेकडे आहे . पण गणेशाची मूर्ती पूर्वेकडे तोंड केलेली आहे . तेथील गणपती डाव्या सोंडेचा आहे . थोरले माधवराव पेशवे या गणपतीच्या दर्शनास वारंवार येत असत . त्यांनी आपल्या काळात या मंदिराचा सभामंडप बांधला आणि देवाचे सानिध्य लाभावे म्हणून देवळाजवळच राहण्यासाठी एक वाडाही त्यांनी बांधला होता . तेथे माधवराव आले म्हणजे मराठीशाहीचा दरबारच भरत असे . माधवराव अकालीच थेऊर मुक्कामीच वारले . त्यांची पत्नी रमाबाई येथेच सती गेली तिची समाधीही नदीकाठी आहे . मोरया गोसावी यांनी तेथेच गणपतीची तपश्यर्या केली . येथील गणपतीच्या व्यवस्थेसाठी या गावचा महसूल थोरले माधवराव पेशवे यांनी देवस्थानला इनाम म्हणून दिला होता
लेण्याद्रीचा गिरिजात्मक
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात लेण्याद्री नावाच्या डोंगरावर हे गणेश स्थान आहे . प्रत्यक्ष पार्वतीला प्रसन्न झालेला हा येथील गणपती होय . या देवळाचे दार दक्षिणेला आहे . हे देऊळ डोंगरात असल्याने , यास कोणी लेणीही म्हणतात . देवळाच्या बाजूला ओवऱ्या कोरलेल्या आहेत . सभामंडप ओलांडून आपण जरा बाहेर गेलो की आठ कोरीव खांब आहेत . थोडेस चालून पायऱ्या उतरून गेल्यावर दगडात कोरलेली भीमाची गदा दिसते . गदेवर वाघ , सिंह वगैरे प्राण्यांची तोंडे कोरलेली आहे . जवळच पाण्याच्या दोन टाक्या आहेत . येथील मखर लाकडी असून ते अगदी अलीकडील काळातील आहे , माघ महिन्यात येथे मोठा उत्सव होतो . येथूनच जवळच शिवनेरी किल्ला आहे . शिवाजी महाराज आपल्या बालपणी आपल्या सवंगडयासह वारंवार या भागात येत असत
मोरगावचा मयुरेश्वर
पुणे जिल्ह्यातील भिमखडी तालुक्यात मोरगाव आहे . सिंधू राक्षसाला ठार मारणारा तो हा मयुरेश्वर होय . या मंदिराच्या चारही बाजूला 50 फूट उंचीचा कोट आहे . मयुरेश्वरच्या डोळ्यात व बेंबीत खरे हिरे बसविलेले आहेत . मस्तकावर नागाची फणी आहे . देवळाचे तोंड उत्तरेकडे आहे . त्याला 11 दगडी पायऱ्या आहेत . देवळात प्रवेश केल्यावर चौकातच दोन दिपमाळा आहेत . चौकातच गणपतीकडे तोंड केलेला उंदीर आहे . सभामंडपाला दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत . देवळाजवळ नगारखान्याची इमारत आहे . मोरगावला एस . टी . किंवा खाजगी बसने जाण्याची सोय आहे . रेल्वेने नाही .
सिद्धटेकचा सिद्धीविनायक
दौंड रेल्वे स्टेशनपासून जलालपूर एस . टी . फाटा आहे . त्या फाटयाजवळ सिद्धटेक नावाचे लहानसे गाव आहे . तेथे सिद्धीविनायकाचे मंदिर आहे . या मंदिराचा गाभारा 15 फूट उंच आहे . गणपतीचे मखर आणि महिरप पितळेचे आहे . सिंहासन दगडी आहे . आतील गाभारा अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला आहे , हे मंदिरही अहिल्याबाईंनीच बांधले आहे . बाहेरचा मोकळा सभामंडप बडोद्याच्या नारायण मैराळ यांनी बांधला आहे . चिंचवडचे मोरया गोसावी यांनी येथे प्रथम तपश्वर्या केली . भाद्रपद आणि माघ महिन्यात येथे उत्सव होतात . कै . न . वि . उर्फ काका गाडगीळांचे आजोळ येथे आहे . म्हणून त्यांनी काही वर्षांपूर्वी येथे येणाऱ्या प्रवाशासाठी धर्मशाळा बांधली आहे . भगवान विष्णूला सिद्धी देणारा असा हा सिद्धीविनायक होय .
बाळू राऊत प्रतिनिधी